अपडेटअमरावतीक्राईमदुर्घटनाशैक्षणिक

आश्रमशाळेतील विषबाधाप्रकरणी अधिक्षक निलंबित व सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Share this post

धारणी तालुक्यातील टिटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी रविवारी रात्री जेवण केल्यानंतर त्यांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला.

विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकूण ५० मुली आणि १९ मुलांना विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले. धारणी येथील रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता पाहून धारणी शहरातील आणि लगतच्या गावांतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बोलावून घेण्यात येत विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले.

टिटंबा येथील आश्रमशाळेत टेंभली येथील सेंट्रल किचनमधून शिजवलेल्या अन्नाचा पुरवठा केला जातो. पोलिसांनी सेंट्रल किचनचा मालक विजय बोथरे, तेथील प्रतिनिधी सचिन सातपुते, स्वयंपाकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह एकूण सहा जणांच्या विरोधात बीएनएस तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.अन्नाचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त करण्यात आले असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.

आश्रमशाळेच्या अधिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे, तर मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

मेळघाटातीलच बिजुधावडी, सावलीखेडा, सुसर्दा येथील आश्रमशाळेतील मुला-मुलींना देखील विषबाधा झाल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली. तेथील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. येथील विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी माधवराव गरूड हे स्वत: तळ ठोकून आहेत. सेंट्रल किचनमधून नऊ आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सकाळचा नाश्ता आणि दोन्ही वेळच्या जेवणाचा पुरवठा केला जातो. त्यातच इतर तीन ठिकाणी देखील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *