मासवण आश्रमशाळेतील ७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू , एकाच महिन्यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
पालघर जिल्ह्यातील मासवन येथील आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतून एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. या आश्रमशाळेत इयत्ता पहिलीमध्ये शिकणाऱ्या श्रीयांश शैलेश आंबात या निष्पाप विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. श्रीयांशला गेल्या काही दिवसांपासून तीव्र ताप येत असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, अवघ्या एका महिन्यात याच आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
२२ ऑगस्ट रोजी मासवण आश्रम शाळेतील चार विद्यार्थ्यांना ताप व सर्दी खोकला यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून शाळेत पाठवण्यात आले होते. या विद्यार्थ्यांचे रक्त नमुने घेऊन डेंगू, मलेरिया व इतर साथीच्या आजारांसाठी तपासणी केली असता विशेष कोणत्याही आजाराचे निदान झाले नसल्याचे स्पष्ट झाले होते.
विद्यार्थी कालपर्यंत सुस्थितीत असल्याचे आश्रम शाळेतील शिक्षकांकडून सांगण्यात आले. मात्र सकाळी अचानकपणे त्याला धाप लागल्याने त्याला प्रथम मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. या विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला प्राणवायूच्या मदतीने १०२ रुग्णवाहिके मधून मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
१५ दिवसांपूर्वी मासवण मधील एका लहान बालकाचा अशाच प्रकारे अचानक अस्वस्थ झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. साथीचा आजार पसरला जात असल्याची शक्यता पाहता ताप असणाऱ्या आश्रम शाळेतील १९ विद्यार्थ्यांना मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि तेथील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
मासवण येथील या आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंत एकूण ४५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये २२० विद्यार्थी आणि २३० विद्यार्थिनींचा समावेश आहे. तसेच आश्रमशाळेच्या वसतिगृहात ३९४ विद्यार्थी वास्तव्यास असून त्यात २०० विद्यार्थी आणि १९४ विद्यार्थिनी आहेत.
२० ते २५ विद्यार्थी तापाने फणफणले असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असल्याचे शाळा प्रशासनाने मान्य केले आहे.
आश्रमशाळेतील प्रशासनाविरोधात पालकांनी अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत. लहान मुलांना पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास गोठवणाऱ्या थंड पाण्याने आंघोळ करावी लागत असल्याचे पालकांनी सांगितले. तसेच, विद्यार्थी आजारी पडल्यास त्यांना वेळेवर स्थानिक शासकीय रुग्णालयात नेले जात नाही किंवा पालकांना कळवून घरीही पाठवले जात नाही.
एकाच आश्रमशाळेत मोठ्या संख्येने मुले आजारी पडणे आणि महिनाभरात दोन चिमुकल्यांचा जीव जाणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेनंतर आरोग्य विभाग आणि आदिवासी विकास विभागाने निद्रावस्थेतून जागे होऊन तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत मासवण आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक व अधीक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.आश्रमशाळेच्या व्यवस्थापन समितीलाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी सविस्तर चौकशी आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली.

