अपडेटउत्तर महाराष्ट्रकृषीशैक्षणिक

सीड बॉल उपक्रमातून विद्यार्थ्यांचा निसर्ग संवर्धनाचा संकल्प

Share this post

निसर्ग संवर्धन व पर्यावरण संरक्षणाचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजावे, या उद्देशाने सीड बॉल कॅम्पेन चाळीसगाव यांच्या वतीने श्रीमती चंपाबाई रामरतन कळंत्री विद्यालय, चाळीसगाव येथे सीड बॉल तयार करण्याचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.

उपक्रमाच्या प्रारंभी सीड बॉल कॅम्पेन चाळीसगावचे प्रमुख हेमंत भास्कर मोरे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले. सध्या अनुभवास येणारे वाढते तापमान हे मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्षतोडीचे परिणाम असून, मानवी जीवनात वृक्षांचे स्थान किती महत्त्वाचे आहे, याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सीड बॉलच्या माध्यमातून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कसे करता येईल, याची माहिती दिली.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद दायमा यांनी निसर्ग संवर्धनासाठी दरवर्षी शाळेमध्ये सीड बॉल तयार करणे व वृक्षारोपणाचे उपक्रम राबविण्यात येतील, असे सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी निसर्ग संवर्धन व पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली.

उपक्रमापूर्वी केलेल्या आवाहनानुसार विद्यार्थ्यांनी विविध वृक्षांच्या बियांचे संकलन करून त्या आपल्या वर्गशिक्षकांकडे जमा केल्या होत्या. सीड बॉल कॅम्पेनचे सदस्य मनोज करंकाळ व अनिल अहिरे यांनी विद्यार्थ्यांना सीड बॉल तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी सीड बॉल तयार केले. या उपक्रमात विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सुमारे १५०० सीड बॉल्स तयार करत निसर्ग संवर्धन व पर्यावरण संरक्षणाचा ठाम संकल्प केला.

तयार करण्यात आलेले हे सीड बॉल्स आगामी पावसाळ्यात गौताळा अभयारण्य व परिसरात रोपण करून वृक्षसंवर्धनास चालना देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *