अपडेटदुर्घटनानंदुरबार

समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना जेवणानंतर विषबाधा 

Share this post

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील समाज कल्याण वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. डाळ भात, शेवगा, चपाती खाल्ल्यानंतर काही वेळाने विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास जाणवू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वस्तीगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्न विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यातील 3 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अन्य विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहादा येथे समाज कल्याण विभागाचे शासकीय वसतिगृहा आहे. दररोज प्रमाणे शनिवारी रात्री सात ते साडेसात वाजे दरम्यान वसतिगृहातील विद्यार्थी जेवण करण्यासाठी बसले. सर्व मुलांना जेवणासाठी शेवग्याची भाजी, भात, पोळ्या दिल्या होत्या. जेवण करतानाच विद्यार्थ्यांना त्रास जाणू लागला. अचानक विद्यार्थ्यांना उलट्या झाल्याने विश्रामगृहात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. विद्यार्थ्यांची अवस्था बघून पालकांनी एकच आक्रोश केला. वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

घटनेची माहिती मिळताच प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी तात्काळ रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यानंतर विषबाधित विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून घडलेल्या घटनेची माहिती घेतली आणि पालकांशीही संवाद साधला. एकूण २५ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींना रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करत वसतीगृहातील जेवणाचे सॅम्पल आणि विद्यार्थ्यांच्या उलट्यांचे सॅम्पल प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतर नेमकी कारणे स्पष्ट होतील. या प्रकरणी पोलिसांनीही प्राथमिक माहिती घेतली असून, ठेकेदार आणि वसतीगृह व्यवस्थापनाकडून जबाब नोंदवण्यात येणार आहेत. या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यातील समाज कल्याण वसतीगृहांच्या व्यवस्थापनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *