शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून, जळगावमध्ये पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार रिंगणात…
जळगाव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटातर्फे पारोळा येथील करण पवार यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबईत ठाकरेचे निवासस्थान ‘मातोश्री’वरही ही घोषणा करण्यात आली.
भाजपचे जळगाव लोकसभा मतदारसंघातील खासदार उन्मेश पाटील व पारोळा येथील भाजपचे युवा नेते व माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. त्यानंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी जळगाव लोकसभेसाठी करण पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
करण पवार हे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आहेत. त्यांचे घराणे राजकीय आहे, त्यांचे आजोबा (कै.)भास्करराव पाटील हे पारोळ्याचे माजी आमदार होते, तर त्यांचे काका डॉ. सतीश पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब पवार हे सहकार क्षेत्रात कार्य करतात.
करण पवार यांचा पारोळा, एरंडोल, भडगाव या तालुक्यात चांगला जनसंपर्क आहेत. करण पवारांचे काका व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, माजी पालकमंत्री सतीश पाटील यांचाही पाठिंबा करण पवार यांना लोकसभेसाठी मिळू शकतो. तसंच, माजी खासदार उन्मेष पाटील यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांचीही साथ त्यांना या निवडणुकीत मिळू शकते. याशिवाय महाविकास आघाडीतील तीन पक्षांची ताकद यामुळं करण पवार यांची उमेदवारी भाजपला डोकेदुखी ठरु शकते. भाजपमधील अंतर्गंत नाराजीचा फायदाही करण पवार यांना होऊ शकतो.


