शिक्षक कुटुंब सुट्टीसाठी राजस्थानला गेले गाडीचा भीषण अपघात, चिमुकल्यांसह ६ जणांचा मृत्यू…
दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने मध्य राजस्थानमध्ये फिरायला गेलेल्या जळगावातील अमळनेर तालुक्यातील शिक्षकांच्या कुटुंबाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.
आज सोमवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास राजस्थानमधील बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ कार कंटेनरवर धडकल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. मयतांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. या घटनेने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शिक्षक धनराज सोनवणे, त्यांची पत्नी सुरेखा बाबूलाल मैराळे उर्फ सुरेखा धनराज सोनवणे (५०), मुलगी स्वरांजली धनराज सोनवणे (५) तसेच गायत्री योगेश साळुंखे (३०), प्रशांत योगेश साळुंखे (७), भाग्यलक्ष्मी साळुंखे (१) या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शिक्षक धनराज नागराज सोनवणे आणि योगेश धोंडू साळुंखे या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब दिवाळीच्या सुट्या असल्याने गाडी क्रमांक एम एच ०४ ९११४ ने राजस्थान फिरायला गेले होते. तर यांच्यासोबत दिनेश सूर्यवंशी यांचे कुटुंब होते. पण ते दुसऱ्या चारचाकीने गेले होते. दोन्ही कुटुंब राजस्थानमधील जैसलमेर येथे फिरायला जात असताना सोमवारी दुपारी पावणे तीन वाजता बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सोनवणे आणि सांळुखे असलेल्या कारने एका कंटेनरला धडक दिली.
यात कारमधील धनराज सोनवणे, त्यांची पत्नी सुरेखा धनराज सोनवणे, मुलगी स्वरांजली धनराज सोनवणे तर योगेश साळुंखे यांची पत्नी गायत्री योगेश साळुंखे, त्यांचा मुलगा प्रशांत योगेश साळुंखे, आणि मुलगी भाग्यलक्ष्मी साळुंखे जागीच मृत्यू झाला. पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर सुरेखा ह्या जखमी होत्या. त्यांची रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे.

