IIT मुंबईतील दोन वसतिगृहांचे मेस बंद करण्याचे FDA चे आदेश
पवई परिसरातील आयआयटीच्या वसतिगृह क्रमांक १ आणि २ मधील मेसची अचानक पाहणी करण्यात आली. या दरम्यान या भोजनगृहांच्या चालकांकडे अन्न सुरक्षेशी संबंधित आवश्यक परवाने नसल्याचे आढळून आले.
त्यानुसार त्यांना कामकाज थांबवण्याचे थेट निर्देश दिले. वसतिगृह क्रमांक १२, १३ आणि १४ मधील मेसच्या पाहणीदरम्यान काही त्रुटी आढळल्याने संबंधित कंत्राटदाराला आवश्यक सुधारणा करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात अन्न सुरक्षा कायद्याची कडक अंमलबजावणी केली जात आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून एफडीएने अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित केले आहेत. आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थेतील वसतिगृह मेसच्या बाबतीतही नियमांचे पालन न केल्यास कारवाई केली जाईल, हे स्पष्ट झाले आहे.
विद्यार्थी आणि पालकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अन्न सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. FDAच्या या कारवाईमुळे इतर मेस चालक आणि कंत्राटदारांनाही आवश्यक परवानग्या घेणे आणि नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे स्मरण झाले आहे. पुढील काळातही अशाच अचानक पाहण्या सुरू राहतील, असे संकेत मिळत आहेत.

