अपडेटचंद्रपूरदुर्घटनाशैक्षणिक

आश्रमशाळेतील ३० विद्यार्थ्यांना विषबाधा

Share this post

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील नगराळा येथील अमरु नाईक माध्यमिक आश्रमशाळेत डाळमध्ये पाल पडल्याने ३० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

डाळ शिजत असताना त्यात जिवंत पाल पडली. मात्र, स्वयंपाकी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला नसल्याचा आरोप आहे. जेवण वाढताना विद्यार्थिनींना डाळमध्ये पालीचे लहान-मोठे तुकडे आढळून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

त्यानंतर अंदाजे ३० विद्यार्थी जेवणासाठी बसले होते. काही विद्यार्थ्यांनी अन्न खाल्ले. मात्र, डाळ वाढत असताना ती वाटप करणाऱ्या विद्यार्थिनींना त्यामध्ये पालीचे लहान-मोठे तुकडे आढळून आले. हा प्रकार लक्षात येताच विद्यार्थ्यांना पुढील जेवण करण्यास मज्जाव करण्यात आला. दरम्यान, काही विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना तातडीने जिवती येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांकडून उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच आश्रमशाळेच्या अधीक्षकांचे जबाब नोंदविण्यात आले आहे . विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या अन्नाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे. अन्न तपासणीच्या अहवालानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनाच्या गुणवत्तेसह स्वच्छतेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्वयंपाकघरात अन्न तयार करताना आवश्यक ती स्वच्छता आणि खबरदारी घेतली जाते का, अन्नाची नियमित तपासणी केली जाते का, तसेच विद्यार्थ्यांना भोजन देण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासली जाते का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *