अपडेटगडचिरोलीदुर्घटनाशैक्षणिक

आश्रमशाळेच्या वसतिगृहात सापाच्या दशांने ३ विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू

Share this post

अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केल्याने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून आणखी तीन मुलींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

गडचिरोली,धानोरा तालुका पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जपतलाई येथील कुप्पा लिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन शाळा तथा अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात ही घटना घडली. मृत विद्यार्थिनींमध्ये सुश्मिता सरोजित मंडल (१४), दीपिका एतवा लकडा (१२) आणि अनु गजुराम कोरेटी (८) यांचा समावेश आहे. तर सर्पदंश झालेल्या दीपिका बिटलूरसाय मडावी (११), समृद्धी सुरेश नैताम (१४) आणि कविता राजकुमार किरंगा (१२) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहातील विद्यार्थिनींना झोपण्यासाठी पुरेशा खाटा उपलब्ध नसल्याने त्या जमिनीवर गाद्या अंथरून वर झोपत होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असतानाच काही विद्यार्थिनींना सापाने दंश केला. घटनेची माहिती मिळताच त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वसतिगृहात विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था, स्वच्छता, सर्पप्रतिबंधक उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची यंत्रणा याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

घटना घडली त्यावेळी वसतिगृहाच्या महिला अधीक्षिका उपस्थित नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून निष्काळजीपणास जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *