अपडेटउत्तर महाराष्ट्रधुळेलाचलुचपत कारवाई

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक लाच घेताना रंगेहाथ ताब्यात

Share this post

तांडा वस्ती सुधार कामाचे बिल मंजूर करण्यासाठी दोन टक्क्यांच्या दराने २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विशाल सुनील चौधरी यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले आहे.

तक्रारदार हे अभियंता व ठेकेदार आहेत. त्यांनी विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने’अंतर्गत धुळे तालुक्यातील मौजे खंडलाय बुद्रुक येथील हाटकर वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे १० लाख रुपयांचे काम पूर्ण केले होते. या कामाचे बिल अदा करण्याच्या मोबदल्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विशाल सुनील चौधरी यांनी ३ टक्क्यांनुसार ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालयाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवली. या तक्रारीची धुळे येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयात पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्याने १० लाखांचे बिल काढून देण्यासाठी अडीच टक्क्यांनुसार २५ हजार रुपयांची लाच मागितली आणि तडजोडीअंती दोन टक्क्यांनुसार २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

त्यानंतर एसीबीच्या पथकाने तात्काळ सापळा रचण्याचे नियोजन केले. पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, पोलीस हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, पोलीस कॉन्स्टेबल रामदास बारेला, प्रवीण पाटील आणि मकरंद पाटील यांच्या पथकाने धुळे येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयात सापळा लावला. यावेळी सहायक संचालक विशाल सुनील चौधरी यांनी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल चौधरी हे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत वर्ग-२ चे अधिकारी म्हणून रुजू झाले होते. गतवर्षी त्यांची निवड झाली, सध्या परिविक्षाधीन काळ सुरू होता. पहिल्याच पोस्टिंगमध्ये १ लाखांचा पगार असतानाही २० हजाराच्या लाचेचा मोह आवरता आला नाही. जळगाव येथील नंदनवन नगरातील त्यांच्या निवासस्थानी झाडाझडती सुरू आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *