अपडेटक्राईममहाराष्ट्रशैक्षणिक

TET पेपर अवघ्या ८ हजारांसाठी फुटला, ६ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

Share this post

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 पेपरफुटी प्रकरणात एक अत्यंत संतापजनक माहिती उघडकीस आली आहे. कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा किंवा हॅकिंग न वापरता, जुन्या आणि साध्या पद्धतीने म्हणजेच बुटाच्या आत पेपर लपवून हा गैरप्रकार करण्यात आला आहे. भिवंडी पोलिसांच्या सखोल तपासानंतर, तब्बल सहा लाख भावी शिक्षकांच्या स्वप्नांचा व्यवहार अवघ्या ८ हजार रुपयांत झाल्याचे समोर आले आहे.

परीक्षेच्या प्रश्नपत्रिका छापण्याचे अत्यंत गोपनीय काम आग्र्यातील महीम पत्रन प्रायव्हेट लिमिटेड या छापखान्याला देण्यात आले होते. या ठिकाणी माजी सैनिकांचा पहारा होता आणि कामगारांची दररोज कसून अंगझडती घेतली जात होती. मात्र, सुरक्षारक्षकांनी कामगारांचे बूट तपासणी केली नाही. याचाच गैरफायदा घेत, नरेशकुमार पुरनचंद माहौर या कर्मचाऱ्याने १५ ते १७ जून दरम्यान पेपर-१ आणि पेपर-२ चे चारही संच बुटाच्या इनसोलखाली लपवून अत्यंत शिताफीने बाहेर काढले. त्यातच भर म्हणून, या अत्यंत संवेदनशील छापखान्यातील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद अवस्थेत होते.

नरेशकुमारला हे कृत्य करण्यासाठी अवघे ८ हजार रुपये रोख आणि भविष्यात एका प्लॉटचे आमिष दाखवण्यात आले होते. त्याच्याकडून प्रत्यक्ष पेपर मिळवल्यानंतर, मुख्य सूत्रधार बीजेंद्र कुमार गुप्ता याने स्वतःच्या दलालांच्या नेटवर्कमार्फत हीच प्रश्नपत्रिका थेट ८० हजार रुपयांना विकली. पुढे एजंटांनी त्यात स्वतःचे कमिशन लावून उमेदवारांची मोठी आर्थिक लूट केली. पोलिसांच्या रडारपासून वाचण्यासाठी हा पेपर व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियावर व्हायरल न करता, केवळ ‘हार्ड कॉपी’च्या स्वरूपातच उमेदवारांपर्यंत पोहोचवला गेला.

मुख्य आरोपी बीजेंद्र गुप्ता हा कोणत्याही एका विशिष्ट परीक्षेला टार्गेट करत नव्हता; तर थेट देशभरातील गोपनीय छापखान्यांमधील कर्मचाऱ्यांना पैशांच्या जाळ्यात ओढून पेपर मिळवणे, हाच त्याचा मुख्य धंदा होता. मात्र, त्याच्या या मजबूत नेटवर्कला भिवंडीत सुरुंग लागला. २८ तारखेच्या परीक्षेच्या अवघे दोन दिवस आधी म्हणजेच २६ जूनला भिवंडी पोलिसांना या गैरप्रकाराची कुणकुण लागली. पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी तातडीने शक्कल लढवत डमी ग्राहक पाठवून हा गोरखधंदा उघडकीस आणला.

या गंभीर घटनेची तातडीने दखल घेत, राज्य सरकारने मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी संपूर्ण परीक्षा संगणकीकृत (CBT – Computer Based Test) करणे, तसेच अत्यंत सुरक्षित डिजिटल पद्धतीने प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्याच्या महत्त्वपूर्ण पर्यायांवर सरकार आता गांभीर्याने विचार करत आहे. भिवंडी पोलिसांच्या तत्परतेमुळे या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *