अपडेटनाशिकलाचलुचपत कारवाईशैक्षणिक

५२ हजारांची लाच घेताना गटशिक्षणाधिकाऱ्यासह तिघे जाळ्यात.

Share this post

नाशिक (दिंडोरी) : शिक्षक दाम्पत्याच्या वेतनश्रेणी फरकाच्या थकीत देयकासाठी प्रस्ताव मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात ५२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गटशिक्षणाधिकारी, एक प्राथमिक शिक्षक आणि जिल्हा परिषदेत कार्यरत कनिष्ठ लेखा अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

या कारवाईत दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण (४८), प्राथमिक शिक्षक नीलेश निंबा भारती (५०) आणि नाशिक जिल्हा परिषदेतील कनिष्ठ लेखा अधिकारी देविप्रसाद चैत्राम पाटील (५०) यांना अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार व त्यांची पत्नी हे दोघेही शिक्षक असून ‘पेसा’ विशेष कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी २००२ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील एकस्तर वेतनश्रेणी फरकाच्या थकीत रकमेचा प्रस्ताव दिंडोरी पंचायत समितीकडे सादर केला होता. या प्रस्तावानुसार तक्रारदारास सुमारे ६.५७ लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीला ६.५५ लाख रुपये देय होते.

हे देयक मंजूर करून वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून लाचेची मागणी करण्यात आली. सुरुवातीला अधिक टक्केवारीची मागणी करण्यात आली होती, मात्र नंतर ती कमी करून ठराविक रक्कम स्वीकारण्याचे ठरविण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ५२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तिघांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी तिन्ही संशयितांविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांच्या या कृत्यामुळे शिक्षण विभागात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *