अनुदानित आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांची गळफास घेवून आत्महत्या
वाडा तालुक्यातील आंबिस्ते खुर्द येथील अनुदानित असलेल्या माध्यमिक आश्रमशाळेतील ९ वी व १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ही घटना बुधवार ०८ ऑक्टोबर २०२५ रात्री १२:३० ते १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह शाळेच्या परिसरातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत.
मोखाडा तालुक्यातील मनोज सीताराम वड (१४ वर्षे इयत्ता ९ वी, रा.दापटी तर देविदास परशुराम नावले (१५ वर्षे – इयत्ता १० वी) रा.बिबळपाडा (दापटी) अशी या गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची नावे असुन ते एकाच गाव पाड्यातील रहिवासी आहेत. या विद्यार्थ्यांच्या आत्महत्याचे कारण अस्पष्ट असले तरीही काही दिवसांवर आलेल्या परीक्षेचे मुलांना ताण आहे की, अजून काही आत्महत्येचे कारण आहे, हे निश्चित कळू शकलेले नाही.गेल्या १५ वर्षातील ही तिसरी घटना असून यापूर्वी एका शिक्षक आणि विद्यार्थी यांनी देखील आत्महत्या केल्याची माहिती आहे.दरम्यान, नुकताच या घटनेबाबत वाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांनी सुरू केला असुन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
मोखाडा तालुक्यातील हे दोन्ही आदिवासी विद्यार्थी देखील या आश्रमशाळेतच लहानपणापासून (इयत्ता पहिली) शिक्षण घेत होते. त्यांची अभ्यासात प्रगती ठीक होती. अशी माहिती मुख्याध्यापक दत्तात्रेय दाते यांनी दिली.बुधवारी रात्रीचे ७:३० वाजताचे नियमित जेवण झाल्यानंतर सर्व विद्यार्थी वसतिगृहात झोपी गेले असताना मनोज वड आणि देविदास नावले या दोघांनीही शाळेच्या पाठीमागे व वसतिगृहाच्या समोरील असलेल्या एका झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेले असल्याचे रात्री १:३० वाजण्याच्या सुमारास उमेश पाटील या सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची तत्काळ माहिती शाळेतील मुख्याध्यापक दत्तात्रेय दाते व व्यवस्थापक अधिक्षक राजू सावकारे यांना दिली. त्यानुसार शाळा प्रशासनाने गावातील सरपंच व पोलीस पाटील तसेच वाडा पोलीस आणि मयत विद्यार्थ्यांच्या पालकांना माहिती देवून कळविले.
विद्यार्थ्यांच्या एकाकी मृत्यूबाबत पालकांना मोठा धक्का बसला असून पालकांनी सकाळी ११ वाजण्याचा सुमारास आश्रमशाळेत जाऊन घडलेल्या घटनेबाबत माहिती मिळविण्याचा प्रयत्न देखील सुरू केला आहे.विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कुठलीही सुसाईट नोट मिळून आली नाही. मात्र एका आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच्या बॅगेत एक मोबाईल मिळून आला असून पोलिसांनी तो तपासा करिता ताब्यात घेतला आहे.
मुख्यध्यापक डी. जी. दाते आणि अधीक्षक राजू सावकारे यांचे निलंबन केले आहे. झालेली ही घटना दुःखदायक असून दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल तसेच विद्यार्थ्यांचे समुउपदेशन करण्याची आवश्यकता आहे अशी प्रतिक्रिया खासदार हेमंत सावरा यांनी दिली आहे. या सर्व घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कडक कार्यवाही करावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल अशी प्रतिक्रिया पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिली आहे. तसेच मुलांच्या पालकांनी देखील कारवाईची मागणी केली आहे.

