राज्यातील सर्व माध्यमातील चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी ९ किंवा ९ वाजल्यानंतर…
राज्यातल्या सर्व पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. लहान मुलांची झोप पूर्ण होण्यासाठी सकाळच्या शाळांच्या वेळा बदलण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. राज्यपालांच्या सूचनेला राज्यातील पालक, शिक्षक आणि अभ्यासकांकडून पाठिंबा दर्शवण्यात आला होता. राज्यात बहुतांश शाळा सकाळी सात वाजताच्या आसपास भरतात. ही वेळ नऊपर्यंत पुढे नेल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन शिकण्यात लक्ष लागेल तसंच पालकांची सकाळी पाच वाजल्यापासून होणारी धावपळ कमी होईल, अशी भूमिका पालकांकडून मांडण्यात येत होती. याला राज्याच्या शिक्षक विभागाने प्रतिसाद दिला आहे.
राज्यातल्या चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्यात आली आहे. राज्य सरकारने शाळांची वेळ बदलण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतलाय. सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा आता सकाळी 9 वाजता भरणार आहेत.
सर्व माध्यमांच्या तसंच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजल्यानंतर भरवण्याचे परिपत्रक राज्य सरकारने काढलंय. राज्यपालांनीही शाळेची वेळ बदलण्याची सूचना केली होती मुलांची झोप होत नसल्याने शाळांची वेळ बदलण्याची मागणी होत होती..अखेर राज्य सरकारने चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे.