शैक्षणिकआंतराष्ट्रीय

चीनच्या खासगी शाळेत मोठी दुर्घटना; आगीत 13 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू…

Share this post

चीन मधील एका शाळेच्या वसतिगृहाला आग लागल्याची घटना समोर आली असून यामध्ये 13 मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

चीनच्या मध्यवर्ती हेनान प्रांतात शाळेचे वसतिगृह आहे. शनिवारी येथे अचानक आग लागली. बघता बघता ही आग वाढत गेली. आगीच्या ज्वाळांनी विक्राळ रुप धारण करत मुलांना यात ओढवून घेतले.

चीनचे अधिकृत वृत्तपत्र ‘द पीपल्स डेली’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. हेनानच्या यानशानपू गावातील एका शाळेत हा प्रकार घडला. शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार रात्री 11 वाजता आग लागल्याचे वृत्त आहे. हेबेई प्रांतातील सरकारी माध्यम संस्था ‘झोंगलान न्यूज’ला एका शिक्षकाने आगीच्या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. मरण पावलेली सर्व मुले तिसरीच्या वर्गातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांकडून नानयांग शहराजवळ असलेल्या शाळेच्या व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. मृतांची ओळख आणि आगीचे कारण याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

दुर्घटनेच्या तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. साधारणपणे प्राथमिक वर्गातील विद्यार्थी या बोर्डिंग स्कूलमध्ये राहतात. यिंगकाई शाळा ही 10 वर्षे जुनी खाजगी शाळा आहे. साधारणपणे आजूबाजूच्या गावातील मुलं येथे शिक्षण घ्यायला येतात. शाळेतील वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावर मुली राहतात, तर मुले तिसऱ्या मजल्यावर राहतात.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *