लाडकी बहीण योजनेबाबत, राज्य सरकारचे बॅंकांना महत्वाचे आदेश
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून माहे जुलै, २०२४ व माहे ऑगस्ट, २०२४ या दोन्ही महिनांच्या एकत्रित रु. ३०००/- इतका आर्थिक लाभ पात्र लाभार्थी महिलांना त्यांचा बँक खात्यात थेट हस्तांतरण करण्यात आला आहे.
तथापि, सदर योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना प्राप्त झालेला आर्थिक लाभ आहरित करता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरी “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत आर्थिक लाभ अंतिम पात्र लाभार्थी महिलांना प्राप्त होण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.
- १) मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतून हस्तांतरित केलेले आर्थिक लाभ (रक्कम) कोणत्याही थकित कर्जाच्या बदल्यात समायोजित केले जाऊ नये, ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती इतर कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नाही.
- २) सदर रक्कम त्याच्या खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये.
- ३) काही लाभार्थ्याकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठविण्यात आले असल्यास सदर बैंक खाते तात्काळ सुरु करण्यात यावे व या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात यावी.