मिचौंग चक्रीवादळाचा दोन राज्यांना तडाखा; अनेक इमारती पाण्याखाली, आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू…
मिचौंग चक्रीवादळाने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांना चांगलाच तडाखा दिला. बंगालच्या उपसागरात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर मिचौंग चक्रीवादळात झालं. या चक्रीवादळाने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांना चांगलाच तडाखा दिला. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे चेन्नईत पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक इमारती पाण्याखाली गेल्या आहेत.
चक्रीवादळात वाऱ्याचा वेग जास्त असल्याने अनेक ठिकाणी घरावरील छतेही उडाली असून झाडांची पडझड झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे.याशिवाय अनेक जण जखमी झाले आहेत. तामिळनाडूसोबत आंध्र प्रदेशाला देखील मिचौंग चक्रीवादळाने मोठा तडाखा दिला आहे. ‘मिचौंग’मुळे कृष्णा जिल्ह्यात तुफान पाऊस झाला असून पूरस्थिती निर्माण झाली आहे.
६०० कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. मिचौग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता आंध्र प्रदेश सरकारने सोमवारी अनेक जिल्ह्यांमधील शाळा तसेच कॉलेजला सुट्टी जाहीर केली.आदेशाचे उल्लंघन केल्यास प्रशासनावर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.