मला पक्षातून काढलं तर कोरोना काळातील सगळे घोटाळे उघड करेन,भाजपा आमदाराचा पक्षाला जाहीर इशारा…
विजयपूर मतदारसंघातील भाजपा आमदार बसनगौडा यांनी पक्षाला जाहीर इशाराच दिला आहे. जर आपल्याला पक्षातून काढलं तर आपण त्या लोकांची नावं उघड करु ज्यांनी पैसे लुटले आणि संपत्ती कमावली अशी धमकीच त्यांनी दिली आहे. येदियुरप्पा यांचं सरकार असताना 40 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यांनी प्रत्येक करोना रुग्णाच्या नावे 8 ते 10 लाखांचं बिल बनवलं आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
बसनगौडा पुढे म्हणाले आहेत की, “त्यावेळी आमचं सरकार होतं. पण सत्ता कोणाची होती याने काही फरक पडत नाही. शेवटी चोर हा चोरच असतो”. येदियुरप्पा सरकारने 45 रुपयांचे मास्क 485 रुपयांत खरेदी केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांनी सांगितलं की, “बंगळुरुत 10 हजार बेड्सची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी भाड्याने 10 हजार बेड्स मागवण्यात आले होते. जेव्हा मला कोविड झाला तेव्हा मणिपाल रुग्णालयाने 5 लाख 80 हजार रुपये मागितले होते. गरीब माणूस इतके पैसे कुठून आणणार?”.
भाजपा आमदाराने केलेल्या या आरोपांनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. त्यांनी म्हटलं की, “भाजपा आमदाराने आमचे सर्व आरोप आणि पुरावे खरे ठरवले आहेत”. भाजपा सरकार 40 टक्के कमिशन सरकार होतं असाही आरोप त्यांनी केला आहे. “यत्नाल यांच्या आरोपांकडे पाहिल्यास भ्रष्टाचार आम्हाला वाटत होता त्याच्याही 10 टक्के जास्त आहे. भाजपा मंत्र्यांचा गट जो आमच्या आरोपांनंतर ओरडत बाहेर आला होता तो आता कुठे लपला आहे?,” अशी विचारणा त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलताना बसनगौडा म्हणाले की, त्यांच्यामुळेच देश वाचला आहे. “त्यांनी मला नोटीस देऊन पक्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर सर्वांचा बुरखा फाडून टाकेन. जर प्रत्येकजण चोर झाला तर राज्य आणि देशाला कोण वाचवणार? देश पंतप्रधान मोदींमुळे वाचला आहे. या देशात भूतकाळात कोळसापासून ते 2 जीपर्यंत अनेक घोटाळे झाले आहेत.”.