संस्थेकडून शिक्षकांच्या वेतनातून आर्थिक वसुली, शाळेवर प्रशासक नेमण्याचे आदेश
शाळेतील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून प्रत्येक महिन्याला वेतन कपात करून फसवणूक केल्याप्रकरणी चाळीसगावच्या जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रशासक नेमण्याचा आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकपुणे संपत सूर्यवंशी यांनी दिला आहे.
या शाळेतील १६ शिक्षकांनी वेतनातून होणाऱ्या कपातीबाबतची तक्रार शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे केली होती. त्यानुसार शिक्षणाधिकारी जळगाव व विभागीय शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी चौकशी केली.त्यासंबंधीचा अहवाल शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे सादर केला होता. २००६ पासून या संस्थेकडून वेतनातून आर्थिक वसुली करण्यात येत होती.
ही कपात महिनागणिक वाढतच जात असल्याने शाळेतील १६ शिक्षकांनी वरिष्ठ कार्यालयाकडे लेखी तक्रारी व त्या संबंधीचे पुरावे दाखल केले होते.
३० जानेवारी रोजी शिक्षण संचालक पुणे यांच्या दालनात झालेल्या सुनावणीदरम्यान शिक्षकांसह संस्थाचालकांचे म्हणणे व जाबजबाब नोंदवून घेतले. त्यानंतर शाळेवर प्रशासक नेमण्याबाबतचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले.