बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन
बॉलिवूडचे ‘हिमॅन’ धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. प्रकृतीच्या कारणास्तव मागील अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. यानंतर घरीच त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र अचानक आज सकाळी एक रुग्णवाहिका धर्मेंद्र यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर चर्चांना उधाण आलं. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठा मुलगा सनी देओलने मुखाग्नी दिला.
धर्मेंद्र यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या देखरेखीखाली ठेवलं होतं. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. घरीच त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेलं. धर्मेंद्र यांनी सहा दशकांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये काम करत एक मोठा वारसा मागे सोडला आहे.’इक्किस’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 25 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी हेमा मालिनी आणि सहा मुलं आहेत. सनी देओल, बॉबी देओल, ईशा देओल, अहाना देओल, अजिता आणि विजेता अशी त्यांना सहा मुलं आहेत.
धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव धरम सिंह देओल आहे. चाहते त्यांना प्रेमाने गरम-धरम म्हणतात. धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये “दिल भी तेरा हम भी तेरे” या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं.
धर्मेंद्र यांचा जन्म पंजाबमधील लुधियाना येथील एका गावात झाला. त्यांनी 1954 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी लग्न केलं आणि नंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. नंतर, ते अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले, ज्यांच्याशी दुसरं लग्न केले.
2012 मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण हा भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविण्यात आलं. सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘यादों की बारात’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘नौकर बीवी का’, ‘फूल और पत्थर’, ‘बेताब’, यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.


