१९३ बस स्थानकांचे होणार नूतनीकरण…
राज्यातल्या १९३ बस स्थानकांच्या नूतनीकरणासाठी, तसंच खासगी सहभागातून १४० स्थानकांच्या विकासासाठी निविदा काढण्यात आल्याचं कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत सांगितलं. यासाठी एमआयडीसी बरोबर सामंजस्य करार केला असून १९३ स्थानकांच्या परिसराचं कॉंक्रीटीकरण, दुरुस्ती आणि रंगरंगोटी केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाची 251 बस आगार, 577 बस स्थानके आहेत. महामंडळाकडे भाडेतत्त्वावर 467 बस असून महामंडळाच्या स्व:मालकीच्या 15 हजार 795 बसेस आहेत. या बसेसमधून दररोज 54 लाख प्रवासी प्रवास करीत असतात. एवढे मोठे जाळे असलेल्या महामंडळाच्या बसस्थानकांचे दोन महिन्याच्या आत सुशोभीकरण व पायाभूत सुविधांचा विकास करून रूपडे पालटण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली आहे. राज्यातील बसस्थानकांच्या दुरुस्तीबाबत आमदार लहू कानडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान आमदार प्रकाश आबिटकर, मनीषा चौधरी , सुलभा खोडके यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.
मंत्री भुसे पुढे म्हणाले की, राज्यात 45 बसस्थानकांचे काम बीओटी तत्त्वावर पूर्ण करण्यात आले आहे. तसेच 72 बसस्थानकांचा विभागाच्या निधीतून विकास करण्यात येत आहे. यामध्ये 70 कामे प्रगतीपथावर आहेत. या वर्षात या कामांसाठी 401 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामधून 97 बसस्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. लोकसहभाग, आपलं गाव -आपलं बसस्थानक या संकल्पनांतूनही बसस्थानके सुशोभित करण्यात येत आहे.


