श्रीलंका क्रिकेट बोर्डाला आयसीसीनं केलं बरखास्त…
श्रीलंका क्रिकेट बोर्डावर आयसीसीनं निलंबनाची कारवाई केली आहे.
मुंबईत वानखेडे स्टेडियमवर 2 नोव्हेंबरला झालेल्या सामन्यात श्रीलंकेला 302 रन्सनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर श्रीलंकन टीमवर श्रीलंकेत टीकेची झोड उठली. श्रीलंकन क्रिकेट चाहत्यांनी बोर्डाच्या मुख्यालयाबाहेर निदर्शनं, धरणं आंदोलनही केलं आणि पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्या पार्श्वभूमीवर क्रीडामंत्र्यांनीही संपूर्ण क्रिकेट बोर्डानं राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती.
शनिवारी 4 नोव्हेंबरला श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सचिव मोहन डी सिल्वा यांनी राजीनामा दिला.दुसऱ्याच दिवशी म्हणजे 6 नोव्हेंबरला श्रीलंकेचे क्रीडामंत्री रोशन रणसिंघे यांनी संपूर्ण श्रीलंका क्रिकेट नियामक मंडळच बरखास्त केल्याचं जाहीर केलं.
श्रीलंकन सरकारनं क्रिकेटमधल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी एक कॅबिनेट कमिटीही नेमली आहे. सध्या श्रीलंकन क्रिकेटचा कारभार पाहण्यासाठी एका सात सदस्यीय अंतरीम क्रिकेट समितीची स्थापना करण्यात आली.तिचं अ्ध्यक्षपद श्रीलंकेचे माजी क्रिकेटर संघाचे कर्णधार अर्जुन रणतुंगा यांना देण्यात आलं. समितीत श्रीलंकन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि बोर्डाच्या एका माजी अध्यक्षांचाही समावेश केला.
आयसीसीच्या नियमांनुसार कुठल्याही देशातील क्रिकेट बोर्डात सरकारचा राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जात नाही. असा हस्तक्षेप झाल्यास त्या देशाच्या टीमवर निर्बंध घातले जातात. या नियमाअंतर्गतच श्रीलंका क्रिकेट बोर्डावर आता कारवाई करण्यात आलीय.


