अपडेटमहाराष्ट्रशैक्षणिक

लाडकी बहीण योजनेसाठी, शिक्षण विभाग, समाज कल्याण व आदिवासी विभागाचा निधी वळवला

Share this post

लाडकी बहीण योजनेसाठी राज्य शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात आहे. मात्र, या योजनेसाठी अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेला शिक्षण विभाग, समाज कल्याण व आदिवासी विभाग निधी वळण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी रक्कम खर्च झाल्यामुळे शिक्षण खात्यातील योजनांसाठी शासनाकडे निधी उपलब्ध नाही. त्यामुळे शिक्षण विभागात कंत्राटी शिक्षकांची भरती केली जात आहे, असा आरोप राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाह व माजी आमदार विजय गव्हाणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळातर्फे येत्या 21 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता पुण्यात अझम कॅम्पस परिसरात शिक्षण शिक्षक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत विजय गव्हाणे बोलत होते. यावेळी जागृती धर्माधिकारी, अजित सुरेश वडगावकर, राजेंद्र भोसले,शरद चंद्र धारूरकर, गणपतराव बालवडकर, वि.ल. पाटील आदी उपस्थित होते.

राज्यातील राज्यातील मराठी शाळांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. राज्य शासनाकडून कंत्राटी शिक्षक भरती राबविले जात आहे. त्यामुळे मराठी शाळा बंद पडत चालल्या असून गरीब व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न निर्माण होणार आहेत. राज्य शासनाकडून कोणत्याही योजनेवर अव्वाच्या सव्वा खर्च केला जात आहे. अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या पूर्वीच्या कल्याणकारी योजनांवरील खर्च कमी करून विविध विभागांचा निधी इतर योजनांसाठी वर्ग करण्यात आला आहे. वेतनेतर अनुदान बंद आहे, त्यामुळे शाळांसमोर विविध प्रश्न निर्माण झाले आहेत.

राज्य शिक्षण संस्था महामंडळातर्फे येत्या 21 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण शिक्षक संवाद या कार्यक्रमात, शिक्षक भरतीबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा. शिक्षकेतर कर्मचारी आकृतीबंध व भरती बाबतच्या सद्यस्थिती संदर्भात विचार व्हावा, अनुदानित शाळा टप्पा अनुदानाबाबत धोरण निश्चित करावे. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सीसीटीव्ही बसविण्यासाठी शासनाने त्वरित अनुदान उपलब्ध करून द्यावे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी बाबत राज्यात निर्माण झालेल्या प्रश्न व समस्यांबाबत चर्चा करावी. समूह शाळांच्या नावाखाली 14 हजार 783 शाळा बंद होणार असून त्यामुळे 1 लाख 85 हजार विद्यार्थी आणि 29 हजार 707 शिक्षकांचे भवितव्य अंधारात येणार आहे, आदी विषयावर शिक्षण शिक्षक संवाद या मेळाव्यात चर्चा केली जाणार आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *