महापरिनिर्वाण दिनादिवशी लोक चैत्यभूमीला का जातात,चला जाणून घेऊया…
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर या पुण्यतिथीला महापरिनिर्वाण दिन असे संबोधले जाते. आज आंबेडकरांच्या ६७व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतासह जगभरात आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन केले जात आहे. अनेक बौद्धधर्मीय या दिवशी दादरच्या चैत्यभूमीला जातात.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण (निधन) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला दादरमधील राजगृहावर आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समुद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी हिंदू स्मशान भूमी एवढीच त्या जागेची ओळख होती. काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक ‘बोधिसत्त्व’ मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरू होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे.भारताच्या सर्व प्रांतातून २५ लाखांहून अधिक बौद्धांचा जनसमुदाय मुंबई येथील चैत्यभूमी, शिवाजी पार्क येथे आंबेडकरांना श्रद्धांजली व आदरांजली अर्पण करण्याकरिता दरवर्षी येतात.
डॉ. आंबेडकरांचे अनुयायी-विचारवंत तसेच देश-विदेशातील जनतेकरिता हे चैत्यभूमी स्मारक प्रेरणास्थान आहे. या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मूर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे, स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात.


