नोकरीसाठी बनावट सेट-नेट प्रमाणपत्र, पडताळणीतून धक्कादायक माहिती समोर – युजीसीचे विद्यापीठांना पत्र…
शिक्षकाच्या नोकरीसाठी टीईटीचे TET बनावट प्रमाणपत्र दिल्याचे प्रकार काही महिन्यांपुर्वी समोर उघडकीस आले होते. आता प्राध्यापक पदासाठीही नेट NET व सेटचे SET बनावट प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
अमरावती, नागपूर व नांदेड विद्यापीठातील जवळपास ७० प्राध्यापकांची सेट-नेट प्रमाणपत्र बनावट असल्याचा अंदाज आहे. संबंधित प्राध्यापकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू असून यामागे रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता सेट-नेट प्रमाणपत्रही बनावट आढळून आल्याने महाविद्यालय स्तरावर खळबळ उडाली आहे.
युजीसीच्या पत्रानंतर विद्यापीठाकडून संबंधित महाविद्यालयांत कार्यरत असलेल्या शिक्षकांची प्रमाणपत्रांची माहिती मागवून त्याची पडताळणी केली जाणार आहे. या पडताळणीमध्ये नेमक्या किती प्राध्यापकांनी बनावट प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली आहे, ही माहिती समोर येणार आहे. अमरावती, नागपूर आणि नांदेड विद्यापीठातील जवळपास ७० प्राध्यापकांबाबत तक्रार असल्याचे समजते. यामागे एखादे रॅकेट कार्यरत आहे किंवा नाही, हे पोलिसांत तक्रार झाल्यानंतरच समोर येणार आहे.
या पार्श्वभूमीवर इतर विद्यापीठातील प्रमाणपत्रांची पडताळणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
