आरटीई 2024 प्रवेश प्रक्रियेला नव्याने सुरुवात, सर्वांना पुन्हा अर्ज भरावा लागणार…
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या आरटी प्रवेश प्रक्रियेला (RTE admission) नव्याने सुरुवात होणार असून पालकांना आपल्या पाल्याचा अर्ज दि.१७ पासून ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांची उत्सुकता आता संपुष्टात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील 1 लाख 2 हजारहून अधिक जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापूर्वी अर्ज भरलेल्या पालकांना आपल्या पाल्याचा अर्ज नव्याने भरावा लागणार आहे.
राज्य शासनातर्फे आरटीई कायद्यात बदल करण्यात आला होता.त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळा आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर गेल्या होत्या. मात्र शासनाने केलेल्या बदलाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर शिक्षण विभागातर्फे नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवावी लागत आहे. आरटीई प्रवेशाच्या पोर्टलवर आरटीई प्रवेशास पात्र असणाऱ्या शाळा व प्रवेशासाठी उपलब्ध जागांची जिल्हा निहाय माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होईल, याबाबत पालकांना उत्सुकता होती.मात्र, राज्याचे प्रार्थमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शुक्रवारपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25 टक्के आरक्षित जागांवरील नवीन प्रवेश प्रक्रिया शुक्रवार दिनांक 17/5/2024 पासून होणार आहे. पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश अर्ज शुक्रवारपासून ऑनलाईन पद्धतीने भरता येईल. यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी RTE 25% अंतर्गत नोंदणी केले होती. त्या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने नोंदणी करणे आवश्यक राहील, याची पालकांनी नोंद घ्यावी.- शरद गोसावी,संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य