वि.जा.भ.ज. प्राथमिक आश्रमशाळेतील १४ विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यामधून विषबाधा
दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी आश्रम शाळेतील काही विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी आणि पोटदुखी अशी लक्षणे जाणवू लागली. खबरदारीचा उपाय म्हणून बाधित असलेल्या १४ विद्यार्थ्यांना त्यामध्ये जीवन गणेश जाधव, महेश अनिल जाधव ,अरविंद अंकुश जाधव ,शिवशंकर कैलास राजने, कार्तिक प्रवीण राठोड समाधान दत्ता जाधव आदेश अंकुश जाधव, रुद्र रामेश्वर जाधव ,किरण सिताराम जंगले ओंकार गजानन सुलभेवार, रोहन मधुकर जाधव, मंगेश मनोहर राठोड, समाधान रवी राठोड, रितेश अवधूत राजने ९ ते १४ वयोगटातील विद्यार्थी उपचारासाठी महागाव ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास दाखल करण्यात आले. बाधित विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयातच रात्रभर अँडमिट ठेवून उपचार करण्यात आले.
शिवाजीराव मोघे प्राथमिक आश्रम शाळेत शिकणारा विद्यार्थी आदेश अंकुश जाधव याने बिसलेरी बॉटलमध्ये ओ.आर.एस. पावडर, इनो पावडर आणि अजून एक औषधी टाकून पाणी पिले. याच बिसलेरी बॉटल मधील पाणी अन्य १३ सहकारी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी दिले. सर्व १४ विद्यार्थ्यांना नंतर मळमळ उलटी व पोटदुखीचा त्रास होऊ लागला. विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने आश्रम शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी चांगलेच घाबरले. फूड पॉयझनिंग ची लक्षणे जाणवू लागलेल्या विद्याथ्यर्थ्यांना उपचारासाठी महागाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. उदय करोडकर यांनी बाधित विद्यार्थ्यांवर उपचार केले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आज सकाळी विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
पाण्यातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीचा आढावा घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशिष पवार यांनी नेहरूनगर येथील शिवाजीराव मोघे आश्रम शाळेत भेट दिली. या भेटीदरम्यान आश्रम शाळेतील अस्वच्छता, स्वयंपाक गृहातील अस्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत शाळा व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला. विद्यार्थी स्वतःच्या हाताने पाण्याच्या बॉटलमध्ये ओ.आर.एस, इनो आणि अज्ञात औषधी टाकून पाणी पीत असताना आश्रम शाळेचे कर्मचारी कुठे गेले होते हा प्रश्न निर्माण झाला आहे.
विषबाधेच्या प्रकरणानंतर शाळेची अंतर्गत सुरक्षा रामभरोसे असल्याचे निदर्शनास येत आहे. शाळेतील विद्यार्थी पिण्यासाठी जे पाणी वापरतात त्या पाणी स्त्रोतांचे नियमित शुद्धीकरण केले जात नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. विद्यार्थ्यांना शुद्ध पेयजल देण्याबाबतच्या सूचना आरोग्य अधिकारी यांनी शाळा व्यवस्थापनाला दिल्या. विद्यार्थ्यांनी पाण्यातून औषधे मिसळलेली बॉटल ताब्यात घेण्यात आली असून, पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. शिवाजीराव मोघे आश्रम शाळेतील स्वयंपाक खोलीत भाजीपाला अस्वच्छ व घाणेरड्या अवस्थेत ठेवण्यात आला होता. भाजीपाला नियमितपणे स्वच्छ धुऊन वापरावा अशा सूचना यावेळी देण्यात आले.
ताप, खोकला, सर्दी पडसा या आजारावरील सिम्टोमॅटिक औषधे विद्यार्थ्यांना देण्यात येतात, याशिवाय वैद्यकीय ज्ञान नसताना आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अँटिबायोटिक्स (प्रतिजैवक) औषधेही देण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. तज्ञ डॉक्टरांनी सुचविल्याशिवाय विद्यार्थ्यांना अँटिबायोटिक्स औषधे देण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार यांनी दिले. विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक तयार करणाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, आणि विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनाने औषधांचे सेवन करू नये असे निर्देशही डॉ. आशिष पवार यांनी दिले.
नेहरूनगर येथील शिवाजीराव मोघे आश्रम शाळेत १२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी शाळेत नाममात्र सुविधा उपलब्ध आहेत. स्वयंपाक गृहातच अग्निशामक उपकरणे ठेवण्यात आली आहेत. या शिवाय मोठ्या प्रमाणात अस्वच्छता येथे आढळून आली. आश्रम शाळेत आमणी, चिल्ली, नांदगव्हाण,बिजोरा,सेनंद, धरमवाडी व अन्य गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
