अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वास मोहिते यांची चौथ्यांदा बिनविरोध निवड
सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती महाराष्ट्र राज्य या समितीच्या अध्यक्षपदी पाडळी केसे तालुका कराड येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार विश्वास मोहिते यांची चौथ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी रत्नागिरीचे पत्रकार सामाजिक कार्य सक्रिय असणारे असलम शेख यांची तर कार्याध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते लोक स्तंभ न्यूज चे संपादक दिपक मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या ठिकाणी आयोजित सर्वसाधारण सभेमध्ये या निवडी करण्यात आल्या. अध्यक्षस्थानी बाबासाहेब कांबळे होते. यावेळी कार्यकारिणी मध्ये संपतराव मोहिते कराड, बाबासाहेब कांबळे शिराळा, दिलीप कांबळे वाई, नासिर सय्यद अहिल्यानगर, विकासभैय्या शेलार महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शेवगाव तालुका प्रमुख अहिल्यानगर, दिलीप महाजन कराड, निलेश तडाखे कराड यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या. यावेळी गत वर्षी प्रमाणे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रत्येकाने आपापल्या तालुका आणि जिल्ह्यामध्ये सामाजिक उपक्रम राबवण्याचे यावेळी ठरवण्यात आले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने प्रत्येकानी 1 ऑगस्ट 2025 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये शालेय साहित्याचे वाटप, नेत्र तपासणी शिबिर, महिला प्रबोधनविषयक कार्यशाळा, सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे विविध उपक्रम राबवून ही जयंती साजरी करावी असेही या बैठकीत सर्व मताने ठरविण्यात आले.
नवनियुक्त अध्यक्ष विश्वास मोहिते यावेळी बोलतांना, महापुरुषांनी जात,धर्म, पंथ यापेक्षा प्रबोधनाला महत्त्व दिले, त्यामुळे आपल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्वधर्मसमभावाच्या विचाराने जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महापुरुषांचा जातीय सलोखा राखण्याचा विचार खऱ्या अर्थाने प्रसार करणे गरजेचे आहे. कोणत्याही महापुरुषांना अंधश्रद्धा मान्य नव्हती, महापुरुषांच्या चरित्राचे वाचन केल्यानंतर त्यांचा अंधश्रद्धेला विरोध होता आणि प्रत्येक पुस्तकातून शिक्षणाला महत्त्व दिल्याचे आपल्याला पहावयास मिळते. त्यामुळे महापुरुषांचे आवश्यक ते विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. असे सांगून विश्वास मोहिते म्हणाले की चौथ्यांदा माझी बिनविरोध निवड करून माझ्यावर दाखवलेला विश्वास नक्कीच सार्थ ठरविन, महापुरुषांच्या विचारांना अभिप्रेत असणारे काम यापुढेही माझ्या हातून कळेल असा विश्वासही यावेळी विश्वास मोहिते यांनी दिला. स्वागत आणि प्रास्ताविक संपतराव मोहिते यांनी केले तर आभार विकास शेलार यांनी मानले.