अपडेटउत्तर महाराष्ट्रजळगावदुर्घटना

पाचोऱ्यातील शिक्षकाची शाळेच्या वर्गात आत्महत्या 

Share this post

पाचोरा शहरात एका खासगी प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने बुधवारी वर्गात विद्यार्थी नसताना छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या सुपडू भादू विद्यामंदिर या शाळेत रवींद्र महाले (४२) हे शिक्षक म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत होते. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळा सुरू झाल्यावर महाले यांनी विद्यार्थ्यांना शिकवले. दरम्यान, साडेनऊच्या सुमारास मधली सुटी झाल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर पाठवले. त्यानंतर वरच्या मजल्यावरील एका वर्ग खोलीची आतून कडी लावून घेत छताला दोरी बांधून गळफास घेतला. मधल्या सुट्टीनंतर परतलेल्या काही विद्यार्थ्यांनी दरवाजा न उघडल्याने वर्गात डोकावून पाहिल्यानंतर त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेतील शिक्षकाचा मृतदेह दिसून आला. विद्यार्थ्यांनी आरडाओरड करून घडलेली घटना इतर शिक्षकांना सांगितली.

दहिगाव संत येथील मूळ रहिवासी असलेले शिक्षक रवींद्र महाले हे सध्या पाचोरा शहरातच वास्तव्यास होते. त्यांनी असे अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने त्यांच्या शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला. शिक्षक महाले यांनी मानसिक तणावामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असून, त्यादृष्टीने पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. शिक्षक महाले यांच्या मागे वडील, आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ आणि बहीण, असा परिवार आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *