राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत शिक्षक हेमंत मोरे तालुक्यात प्रथम
चाळीसगांव येथील सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ चाळीसगांव संचालित इतर मागास बहुजन कल्याण विभाग प्राथमिक आश्रमशाळा राजदेहरे येथील शिक्षक हेमंत भास्कर मोरे यांनी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडियो निर्मिती या राज्यस्तरीय स्पर्धेत – इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी – विषय समाजशास्त्र गटात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
आजच्या आधुनिक काळामध्ये ऑनलाइन शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शैक्षणिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचे देवाण-घेवाण करण्यासाठी शैक्षणिक व्हिडिओ व इतर तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होतांना दिसतो, यात शैक्षणिक व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी स्व-अध्ययन करतांना दिसतात, यामुळे डिजिटल शिक्षणाचे एक वेगळे महत्त्व शिक्षण क्षेत्रात निर्माण झाले आहे. याच उद्देशाने महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग विविध उपक्रम व स्पर्धेच्या माध्यमातून शिक्षकांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी संधी उपलब्ध करून देत असते.
समग्र शिक्षा अभियान जळगांव व गटसाधन केंद्र पंचायत समिती चाळीसगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात, चाळीसगांव तालुक्याचे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्या हस्ते शिक्षक हेमंत भास्कर मोरे यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला विकास पाटील – प्राथमिक शिक्षणाधिकारी जळगांव, अनिल झोपे – प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,जळगाव, प्रशांत पाटील – तहसीलदार चाळीसगांव, सचिन परदेशी – उपशिक्षणाधिकारी, विलास भोई – गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती चाळीसगांव, अन्सार शेख – गटविकास अधिकारी पंचायत समिती चाळीसगांव, राजेंद्र राठोड – माजी सभापती समाज कल्याण , डॉ.शुभांगी पूर्णपात्रे व चाळीसगांव तालुक्यातील सर्व केंद्रातील केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक,शिक्षक व आदी मान्यवर उपस्थित होते.
