वनसंपदा टिकवण्यासाठी चाळीसगाव शहरात सीड बॉल कॅम्पेन
शहर विस्तारीकरण, आधुनिकीकरण, जंगलात होणारी अवैध वृक्ष तोड व इतर बऱ्याच कारणांनी वनसंपदा संपवण्यासाठी हजारो टोळ्या कार्यरत आहे, दिवसेंदिवस वृक्षांची संख्या कमी होत आहे, त्यामुळे दरवर्षी तापमानात होणारी वाढ, वातावरणात अवेळी होणारे बदल, हे आपण सर्वच अनुभवतोय यासाठी वृक्षांची संख्या वाढवणे आवश्यक आहे.
हाच ध्यास घेऊन वनसंपदा टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी चाळीसगांव शहरात सीड बॉल कॅम्पेन राबविले जात आहे.या सीड बॉल कॅम्पेनमध्ये शिक्षक,शासकीय कर्मचारी, व्यवसायिक, शेतकरी, विद्यार्थी, डॉक्टर, वकील व इतर लोक एकत्र येऊन सीड बॉलच्या माध्यमातून वनसंपदा टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
चाळीसगांव शहरालगत गौताळा अभयारण्याच्या माध्यमातून मोठी वनसंपदा लाभली आहे. ती टिकण्यासाठी व त्यात वाढ होणे महत्वाचे आहे, ज्या डोंगराळ भागात जाऊन वृक्षारोपण करणे शक्य नाही अशा ठिकाणी ही सीड बॉल टाकून वृक्षांची संख्या वाढवण्यासाठी सीड बॉल कॅम्पेनचे सदस्य प्रयत्न करत आहे.
काळानुसार वनीकरणाचा विचार रुजवायचा असेल तर त्यासाठीची पद्धतीही बदलावी लागणार आहे. त्याच अनुषंगाने बियांची रुजवणूक करण्यासाठी ” सीड बॉल्स ” ही अत्यंत सोपी, स्वस्त आणि उपयुक्त संकल्पना आहे. यात माती, शेणखताचा वापर करत गोळे बनवले जातात. त्यात जांभूळ, बोर, शिवण, आवळा, बकूळ, पांगारा, अमलताश, चिंच, आंबा अशा विविध झाडांच्या बिया रोवल्या जातात. पावसाळ्यात हे सीड बॉल्स मधील बिया पर्यावरणासाठी अत्यंत पोषक ठरतात. तोंडावर आलेला पावसाळा हा काळ सीडबॉल्स बनवण्यासाठी सर्वोत्तम आहे.
सीड बॉल्स या पद्धतीने निसर्गाला बिया उपलब्ध करून दिल्या जातात त्यानंतर निसर्ग जेव्हा स्वतःच स्वतःच्या परिक्षेत्रातील बियांचं पोषण करत त्यांना रुजवतो, ती पद्धत प्रभावी ठरते. विशेषतः काटेरी झुडूपांच्या बुंध्याशी जी माती असते त्यात अधिक आर्द्रता असते. त्यामुळेच झुडूपाच्या बाजूची माती कितीही रखरखीत असली तरीही बुडालगतची माती काहीशी ओलसर असते. अशा ठिकाणी हे सीड बॉल टाकले तर त्यातून येणारं रोप अगदी सहज जगतं. या रोपाला उगतानाच काटेरी संरक्षण लाभतं. त्यामुळे बकरी किंवा अन्य प्राण्यांपासनं त्याचं संरक्षण होतं. हे रोपटं मोठं झालं तर काटेरी झुडूपाचाही ऊन्हापासून बचाव देखील होतो.
सीड बॉल कॅम्पेनचे प्रमुख हेमंत भास्कर मोरे सदस्य मनोज करंकाळ, अनिल आहिरे, शिवकुमार देवरे, किरण चौधरी, नितीन पाटील, संदीप बडगुजर, अजय सूर्यवंशी, दिलीप पवार, संजय राठोड, योगेश बोरसे, प्रविण बोरसे, दिनेश पचलुरे व इतर सदस्य मागील चार वर्षांपासून हजारो सीड बॉल तयार करून वनसंपदा वाढवण्यासाठी रोपण करत आहे.
