शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाचे महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन,गुन्हा दाखल
आदिवासी विकास विभागाच्या कळवण प्रकल्प अंतर्गत सुरगाणा तालुक्यातील आंबुपाडा बेडसे येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने संस्थेतील दोन महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन केल्याने त्याच्यावर बाऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक येथील निवासस्थानाहून मुख्याध्यापकास ताब्यात घेण्यात आले आहे.
सुरगाणा तालुक्याच्या आंबुपाडा बेडसे येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक माणिक पंडित बच्छाव (५६, रा. मेघराज बेकरी जवळ, पेठरोड, नाशिक) हे संस्थेतील महिला कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळेस फोन करणे, त्यांच्या निवासस्थानाचा दरवाजा वाजवणे, दवाखान्याच्या रूममध्ये महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील कृत्य करण्याच्या उद्देशाने शारीरिक झटापट करणे,रात्रीच्या वेळी मद्यपान करून त्रास देणे.
याबाबत महिला कर्मचाऱ्यांसह इतर शिक्षकांनीही मुख्याध्यापक माणिक पंडित बच्छाव यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुख्याध्यापक या पदाचा वापर करत त्याने कामावरून काढून टाकेल, इतर कामात बेजबाबदारपणा केल्याचे कागदोपत्री दाखवेल अशी धमकी देऊन हा प्रकार वारंवार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारास कंटाळून संबंधित दोन महिला कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि.५ मार्च) सकाळी बाऱ्हे पोलीस ठाण्यात स्वतः येऊन मुख्याध्यापकाच्या विरोधात फिर्याद दिली. यामुळे मुख्याध्यापक बच्छाव याच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत बाऱ्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
या प्रकाराबाबत एका महिला कर्मचाऱ्याने प्रकल्प कार्यालयात तक्रार अर्ज केला होता. मात्र, ७ दिवस याबाबत काहीही कार्यवाही झाली नव्हती. संबंधित महिला कर्मचाऱ्याने सोमवारी पुन्हा कळवण प्रकल्प कार्यालयात जात अधिकाऱ्यांची भेट घेत व्यथा सांगितली. यामुळे प्रकल्प अधिकारी अकुनूरी नरेश यांनी समिती गठित करून चौकशीसाठी आंबुपाडा बेडसे येथे मंगळवारी (दि. ४ मार्च) पाठवले. समितीने दिवसभर संबंधित महिला इतर शिक्षक व विद्यार्थिनीशी चर्चा करून अहवाल तयार केला आहे.या अहवालानुसार योग्य ती प्रशासकीय कार्यवाही मुख्याध्यापक बच्छाव यांच्यावर करण्यात येईल असे सांगण्यात आले.
