३१ ऑक्टोंबर – जुनी पेन्शन योजना बंद करण्याच्या शासन निर्णयाच्या निषेधार्थ कर्मचारी काळ्या फिती लावून कर्तव्यावर.

नागपूर : महाराष्ट्र शासनाने ३१ ऑक्टोबर २००५ रोजी राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे २००५ नंतर नियुक्त झालेल्या बऱ्याच कर्मचारी यांच्या मनात या निर्णयाबाबत असंतोष आहे. जुनी पेन्शन बंद करून विचारांची अपरिपक्वता व दूरदृष्टीचा अभाव असल्याचे दाखवल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
या निषेधार्थ जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपले शासकीय कर्तव्य बजावले. पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, एनपीएस हटाव अश्या घोषणा देत, काळ्या फिती लावून शासन निर्णयाचा जाहीर निषेध नोंदवला. राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना पुन्हा जुनी पेन्शन पूर्ववत बहाल करावी म्हणून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना २०१५ वर्षापासून आंदोलन, उपोषण, धरणे आंदोलनांच्या माध्यमातून लढा देत आहे. २०१६ पासून राज्यातील कर्मचारी ३१ ऑक्टोंबर हा काळा दिवस म्हणून पाळतात.
निवृत्तीनंतरच्या जीवनातील आर्थिक आधार म्हणून पेन्शनकडे पाहिले जाते. निवृत्तीनंतरचे उत्पन्न, मृत्यूनंतर कुटुंबाची काळजी वाहणारी व्यवस्था, स्वाभिमानाचे जीवन जगण्यासाठी आवश्यक बाब पेन्शन आहे. शासनाने २००५ साली हाच कर्मचाऱ्यांच्या वृद्धापकाळातील महत्वाचा आधार हिरावून घेतला, त्यामुळे शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी भावना मिलिंद उदय प्राथमिक शाळा शांतीनगर नागपूर येथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.