समग्र शिक्षा च्या धर्तीवर आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरतीचा निर्णय
शासकीय आश्रमशाळांमध्येही ‘समग्र शिक्षा’च्या धर्तीवर शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या शाळांमधील संगणक, क्रीडा आणि कला विषयाच्या एकूण १ हजार ४९७ शिक्षकांची पदे निविदा काढून बाह्य स्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत.
यासंदर्भात आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांनी नुकताच आदेश काढला असून राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ४९९ शासकीय आश्रमशाळांसाठी ४९९ कला शिक्षक, ४९९ क्रीडा शिक्षक आणि ४९९ संगणक शिक्षक अशा एकूण १४९७ शिक्षकांची भरती करण्याचे आदेश निघाले आहेत. जीईएम पोर्टलवर त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला असून या भरतीकरिता एकूण ८१ कोटी ८ लाख ७५ हजार रुपयांच्या निधीलाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
क्रीडा, संगणक व कला शिक्षकांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय २०१८-१९ पासून आदिवासी विकास विभागाने घेतला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून ११ महिन्यांच्या करारावर ही पदे भरण्यात येत होती. अर्थात राज्यातील सर्वच आश्रमशाळांमध्ये पदे भरण्यात आलेली नव्हती. ज्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरण्यात आले आहेत, त्यातील काही शिक्षकांनी सेवेत कायम करण्याबाबत पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे. यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात ही पदे बाह्य स्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या १६ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार क्षेत्रीय कार्यालयाचा सुधारित आकृतिबंध निश्चित करण्यात आला आहे.