आश्रमशाळेत तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मृत्यू
नाशिक जिल्ह्यातील चणकापूर शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. रोहित बागुल असे या मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेनंतर आश्रमशाळेच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका होत आहे.
रोहित बागुल हा विद्यार्थी चणकापूर येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेत होता. दोन दिवसांपूर्वी त्याची तब्येत बिघडली होती, पण त्याला वेळेवर उपचार मिळाले नसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. शाळेतील अधीक्षक व मुख्याध्यापक यांच्याकडे जबाबदारी असतांना योग्य वेळी रोहितला वैद्यकीय मदत मिळाली नाही. रोहित आजारी असताना आश्रमशाळेचे अधीक्षक संजय नांदणे हे रजेवर होते, तर मुख्याध्यापक बालाजी भुजबळ हे देखील शाळेत उपस्थित नव्हते. या दोघांच्या निष्काळजीपणामुळे रोहितचा जीव गेल्याचा आरोप रोहितच्या कुटुंबियांनी केला आहे. संतापजनक बाब म्हणजे रोहितच्या मृत्यूनंतर मृतदेह तब्बल पाच तास मुख्याध्यापकांच्या टेबलावर पडून होता.
रोहितच्या मृत्यूने पालकवर्ग संतापला होता. शेकडो पालकांनी शाळेसमोर जमून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. आमच्या लेकरांचा जीव एवढा स्वस्त आहे का ? शासन लाखो रुपये खर्च करते, पण अधिकारी आमच्या लेकरांना जिवंत ठेवू शकत नाहीत. दोषींवर गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरू, दोषींवर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही पालकांनी दिला आहे.
या घटनेची माहिती मिळताच आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा व प्रकल्प अधिकारी अंकुनुरी नरेश तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीत मुख्याध्यापक बालाजी भुजबळ आणि अधीक्षक संजय नांदणे यांनी या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचे समोर आले. त्यामुळे या दोघांना तातडीने निलंबित करण्यात आले.
या घटनेमुळे राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, आदिवासी आयुक्त कार्यालयाने दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त होत आहे.