CIBIL स्कोरबाबत RBI ने नियम बदलला, जाणून घ्या
वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, गृहकर्ज असो किंवा शैक्षणिक कर्ज कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना कर्ज देणाऱ्या वित्तिय संस्था किंवा बँकांकडून सर्वप्रथम क्रेडिट स्कोर बद्दल विचारणा केली जाते. कोणत्याही बँकेकडून वरीलपैकी कोणतेही कर्ज घेताना क्रेडिट स्कोर अत्यंत महत्त्वाचा असतो. क्रेडिट स्कोअर हा प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांवर ठरत असतो.
आरबीआयच्या नवीन नियमानुसार पुढील वर्षी १ जानेवारीपासून क्रेडिट स्कोअर अपडेट होण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. आरबीआयच्या नवीन नियमांनुसार ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर दर १५ दिवसांनी अपडेट केला जाईल.
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 8ऑगस्ट 2024 रोजी हा नवीन नियम जाहीर केला ज्याअंतर्गत क्रेडिट डेटा दर 15 दिवसांनी अपडेट होईल आणि हा डेटा प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत किंवा महिन्याच्या अखेरीस किंवा क्रेडिट संस्था (CI) आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (CIC) यांनी परस्पर मान्य केलेल्या तारखेनुसार अपडेट केला जाईल असे जाहीर केले.
सध्याच्या स्थितीनुसार एखाद्या कर्जदाराने ईएमआयवर डिफॉल्ट केले तर क्रेडिट रिपोर्टमध्ये माहिती दिसण्यासाठी 60 दिवस म्हणजे किमान दोन महिने इतका कालावधी लागतो. परंतु नवीन नियमांनुसार जेव्हा कर्ज कंपन्या आणि बँका दर 15 दिवसांनी क्रेडिट माहिती अपडेट करतील, तेव्हा डीफॉल्ट माहिती 30-40 दिवसांच्या आत क्रेडिट अहवालात दिसू लागेल ज्यामुळे वेळेवर पेमेंट करणाऱ्या ग्राहकांची संपुर्ण आर्थिक माहिती रिपोर्टमध्ये दिसून येईल आणि क्रेडिट स्कोअर सुधारण्याची शक्यता वाढेल.

