सागाची झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी आठ हजारांची लाच, गुन्हा दाखल
सागाची झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी आठ हजारांची लाच स्विकारताना मोंढाळा ता.पारोळा येथील वनपाल दिलीप भाईदास पाटील (वय ५२ रा. देवपूर, धुळे) व चोरवड वनपाल वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड (वय ३८, रा. चोरवड ता पारोळा) यांना जळगाव एसीबीने लाच घेताना अटक केली आहे. या कारवाईमुळे वनविभागात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे शेतात लागवड केलेल्या सागाच्या झाडांची शेत मालकाकडून खरेदी करण्याचा व्यापार करतात. तक्रारदाराने पारोळा तालुक्यातील इंधवे येथील शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या सागाचे झाडे तोडण्याचा शेतकरी व तक्रारदार यांच्यात साठ हजार रुपयांचा सौदा निश्चित केला. शेतकऱ्याने उपवन विभाग, पारोळा येथून सागाची झाडे तोडण्याची परवानगी मिळण्यासाठी रितसर पत्र दिले मात्र परवानगी देण्यासाठी तक्रारदाराकडे आरोपी यांनी आठ हजारांची लाच मागितली.
तक्रारदार यांनी एसीबीकडे गेल्या १९ जून रोजी याबाबत तक्रार केली होती तक्रार आल्यानंतर पडताळणी करण्यात आली. ठरल्याप्रमाणे २ जुलै रोजी लाच देण्याचे निश्चित करण्यात आज रोजी वनपाल दिलीप पाटील यांच्या सांगण्यावरून आरोपी महिला वैशाली गायकवाड यांनी लाच स्वीकारताच दोघांना अटक करण्यात आली. दोघांचे मोबाईल जप्त करण्यात आले याबाबत पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्र एसीबी पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनात जळगाव एसीबी चे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, फौजदार सुरेश पाटील, शैला धनगर, किशोर महाजन, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी यांनी केली.