विद्यार्थ्यांना अपूर्ण सुविधा व अनियमितता प्रकरणी आश्रमशाळेला एक लाखाचा दंड
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थी यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सोयी सुविधा व अनियमितता प्रकरणी एक लाखाचा दंड आकरण्यात आल्याने इतर आश्रम शाळेत एकच खळबळ उडाली आहे. सदर कारवाई इतर मागास बहुजन कल्याण पुणे संचालक ज्ञानेश्वर खिल्लारी यांनी केली.
राजकुमार राजभोज यांनी शाळेत होणारा गैरप्रकार अनियमितता बाबत संचालक पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संचालक पुणे यांनी सहायक संचालक इतर मागास बहुन कल्याण परभणी यांनी या आश्रमशाळेची सखोल तपासणी करुन अहवाल या संचालनालयास सादर केल्याचे आदेशित केले.
सहायक संचालक इतर मागास बहुन कल्याण परभणी यांनी या आश्रमशाळेची सखोल तपासणी करुन अहवालातील कसूरीच्या अनुषंगाने अध्यक्ष सचिव वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ गंगाखेड व मुख्याध्यापक, माध्यमिक आश्रमशाळा, गंगाखेड यांना जिल्हा कार्यालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली.
यात संस्थेची स्वतःच्या मालकीची २ एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमिन नाही. वर्गखोल्यामध्ये व कार्यालयात पुरेशे फर्निचर उपलब्ध नाहीत. आश्रमशाळेमध्ये प्रयोगशाळा उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांना दररोज नाष्टा देण्यात येत नाही. विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी लोखंडी कॉट नाही, चादर, सतरंजी, ब्लॅकेट, उशी, मच्छरदाणी असा पुर्ण संच दिलेला नाही. बायोमॅट्रीक यंत्र बसवलेले नाही. आरक्षण धोरणानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. बिंदुनामावली अद्ययावत ठेवण्यात आलेली नाही. पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर बसविण्यात आलेला नाही. सांडपाण्याची व्यवस्था शात्रीय पध्दतीने करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी वर्षातून एक वेळा केली जाते. कार्यालयीन अभिलेखे अद्यावत ठेवलेले नाहीत. आश्रमशाळेत महिला तक्रार निवारण समिती गठीत केलेली नाही. मुलींच्या निवासस्थानी बेल व इतर सुरक्षिततेबाबत उपाय योजना नाही, कुलुपबंद तक्रार पेटी नाही, महिला समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली नाही.धमार्दाय आयुक्त यांचेकडील नोंदणी अद्ययावत नाही तसेच धमार्दाय आयुक्त यांचेकडे मागील ३ वर्षाचे लेखे दाखल करण्यात आलेले नाहीत.सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता न घेता कर्मचारी निलंबन बडतर्फ केले. समायोजनाचे कर्मचारी रुजू करुन घेतले नाहीत, इमारत भाड्याची असल्याने भाडे करार दुय्यम निबंधकांकडे पंजीकृत केलेला नाही. जेष्ठ शिक्षकाची मुख्याध्यापक पदी नियुक्ती केलेली नाही.शासन निर्णय दि. १६.१०.२०१२ अन्वये बंदी असताना शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची नियुक्ती केलेली आहे. संस्थेकडे १० लाखाची ठेव नाही. आश्रम शाळेचे विवरणपत्र प्रत्येक महिन्याचे सहाय्यक संचालकांकडे दिलेली नाहीत. आश्रमशाळेत पालक समिती नेमण्यात आलेली नाही. आश्रमशाळा परिसरात १०० पेक्षा जास्त जिवंत झाडे नाहीत. आश्रम शाळा परिसरात स्वच्छता व टापटिपपणा ठेवण्यात येत नाही आश्रमशाळा संहितामधील नमूद नियम व निदर्शनास आलेल्या आश्रमशाळेच्या स्तरावरील त्रुटी यामध्ये सदरहू आश्रमशाळेच्या स्तरावरून नियम व अटींचे पालन न करता आश्रमशाळेचे कामकाज चालवले जात आहे.
शासन निर्णय दि.०४.१२.२०१८ मधील नमुद मुद्यांनुसार प्राथमिक आश्रमशाळेच्या कामकाजात अनेक त्रुटी आसल्याचे अहवालात स्पष्ट केले नमूद त्रुटींच्या अनुषंगाने अध्यक्ष सचिव, वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ, गंगाखेड व मुख्याध्यापक माध्यमिक आश्रमशाळा यांनी पुढील शैक्षणिक वषार्पासून त्रुटीतील सर्व सुविधा देण्यात येतील व संस्थेच्या मालकीची २ एकर जमीन आहे तिचा ७/१२ संलग्न करण्यात येईल.
मात्र व्यवस्थापनाने त्रुटींची पूर्तता व संस्थेची स्वतःच्या मालकीची २ एकर जमीन असल्याबाबत आवश्यक ते स्वयंस्पष्ट पुरावे सादर केला नसल्याने संचालक ज्ञानेश्वर खिल्लारी यांनी एक लाखाचा दंड आकारून दंडात्मक कारवाईबाबत, प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक विमाग छत्रपती संभाजीनगर यांनी सदर दंडाची रक्कम संस्थेच्या बँक खाते अनामत रक्कम स्थावर मालमत्ता इ.मधून वसूल करावी व अहवालात नमूद त्रुटींची पुर्तता करण्याच्या अटीच्या अधिन राहून संस्थेस आश्रमशाळेच्या कामकाजात सुधारणा करण्याकरीता नैसर्गिक न्याय तत्वानुसार सुधारण्याची एक संधी देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.