अपडेटधाराशिवनांदेडपरभणीशैक्षणिक

आश्रमशाळांमधील अग्निसुरक्षा प्रतिबंधक साहित्य पुरवठ्याची होणार चौकशी

Share this post

इतर मागास बहुजन कल्याण विभागा अंतर्गत चालविण्यात येणार्‍या खाजगी अनुदानीत आश्रमशाळांना पुरविण्यात आलेल्या अग्निसुरक्षा प्रतिबंधक साहित्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार माजी आ.विजय भांबळे, अ‍ॅड. सुमन उफाडे यांनी तक्रार दाखल केली होती.सदर तक्रारीची दखल घेत इतर मागास बहुजन कल्याण विभागाने चौकशीबाबत परिपत्रक काढले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागा अंतर्गत चालविण्यात येणार्‍या खाजगी अनुदानित आश्रम शाळांना अग्निसुरक्षा प्रतिबंधक साहित्य पुरविण्याच्या अनुषंगाने आश्रमशाळांना साहित्य पुरविण्याबाबत प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. ई निविदा पध्दतीचा अवलंब करुन पुरवठादारांच्या निविदांची तांत्रिक व वित्तीय तपासणी केल्यानंतर एमएस धनश्री फायर सर्व्हीसेस या संस्थेला आदेश देण्यात आले. २४ कोटी ४५ लक्ष ४७ हजार रुपयांचे आदेश होते. परभणी, नांदेड व धाराशिव जिल्ह्यातील निवासी आश्रमशाळांमध्ये पुरवठादार संस्थेने पुरवठा आदेशानुसार ९० दिवसांमध्ये काम पूर्ण केले नाही. काही शाळांमध्ये साहित्य न बसविता बोगस कागदपत्र तयार करुन बिल काढले.

याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. नांदेड, धाराशिव, परभणी जिल्ह्यात चौकशी होणार आहे. या समितीत अध्यक्ष म्हणुन संचालक महाराष्ट्र अग्नीशमन सेवा संचालनालय मुंबई, सदस्य म्हणुन सहसंचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे, प्रादेशिक अग्नीशमन अधिकारी छत्रपती संभाजीनगर, कार्यकारी अभियंता विद्युत सा.बां. विभाग नांदेड तर सदस्य सचिव म्हणुन सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण वाशिम यांचा समावेश आहे. सदर समितीला एक महिन्यात अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *