अपडेटक्राईमनागपूरमहाराष्ट्रशैक्षणिक

शालार्थ घाेटाळ्यानंतर, शिक्षक भरती व वेतनासाठी सुधारित नियमावली

Share this post

शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये शिक्षण विभागाने आता शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीसाठी सुधारित नियमावली जाहीर केली आहे. यापुढे शिक्षक पदाची वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी आदेश निर्गमित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता आदेश, शालार्थ आयडी आदेश प्रत, नियुक्ती आदेश व रुजू अहवाल शालार्थ संकेतस्थळावर अपलोड करणे अनिवार्य करण्याचे आदेश, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी जारी केले. नव्या नियमांचे पालन न करणाऱ्या शाळा व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

शालार्थ ही महाराष्ट्र शासनाची एक केंद्रीकृत प्रणाली आहे. सरकारी आणि अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर वेतन आणि सेवाविषयक माहितीचे व्यवस्थापन यावर केले जाते. या प्रणालीद्वारे खाते आणि कोषागार संचालनालयाच्या इतर महत्त्वाच्या विभागांशी माहितीची देवाणघेवाण देखील करता येते.

नागपूर जिल्ह्यामध्ये शालार्थ प्रणालीचा गैरवापर करून शेकडो शिक्षकांची बनावट नियुक्ती करून कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आली. त्यामुळे शासनाने आता शालार्थ आयडी प्रणालीमध्ये नवीन सुधारणा सूचवल्या आहेत. यानुसार, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याच्या पदाची वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी आदेश निर्गमित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता आदेश, शालार्थ आयडी आदेश प्रत, नियुक्ती आदेश व रुजू अहवाल शालार्थ पोर्टलवर विभागीय शिक्षण उपसंचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष यांच्या स्तरावरून अपलोड करण्याचे आदेश आहेत. यामुळे शाळा व्यवस्थापन, शिक्षणाधिकारी, उपसंचालक आणि इतर संबंधित अधिकारी यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी येणार आहे.

सुधारित नियमावलीनुसार खासगी, जिल्हा परिषद, अनुदानित, महापालिका, नगरपालिका सर्वच शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन फक्त शालार्थ प्रणालीद्वारेच अदा करण्यात येणार आहेत. चुकीची माहिती किंवा अपूर्ण नोंद असल्यास त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणार आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना ७ जुलै २०२५ नंतर वैयक्तिक मान्यता किंवा शालार्थ आयडी देण्यात आले, त्या प्रकरणांची सर्व कागदपत्रे विभागीय शिक्षण उपसंचालक किंवा मंडळाचे विभागीय अध्यक्ष यांच्या स्तरावरून शालार्थ पोर्टलवर अपलोड केली जाणे अनिवार्य आहे. तसेच २०१२ ते २०२५ दरम्यान ज्या कर्मचाऱ्यांना आयडी दिले गेले, त्यांच्या संदर्भातील नियुक्ती आदेश, वैयक्तिक मान्यता आदेश व रुजू अहवाल शाळा स्तरावरून ३० ऑगस्टपर्यंत अपलोड करणे बंधनकारक राहणार आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *