अर्जित रजा मंजूर करण्यासाठी लाच घेणारा केंद्रप्रमुख एसीबीच्या जाळ्यात
तक्रारदाराची ४६ दिवसांची अर्जित रजा मंजूर करण्यासाठी लिसनगाव (ता. लोहा) जिल्हा परिषद शाळेतील केंद्रप्रमुखाला ३ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने लोहा येथे १६ फेब्रुवारी रोजी रंगेहाथ पकडले. दिगंबर रामचंद्र शिंदे (५७) असे संशयिताचे नाव असून ते लिसनगाव जि. प. शाळेत केंद्रप्रमुख आहेत. सध्या त्यांची नेमणूक लोहा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे.
तक्रारदार २०१८ पासून भाद्रा (ता. लोहा) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी खासगी कारणास्तव ९ फेब्रुवारी रोजी ४६ दिवसांची अर्जित रजा मंजूर होण्यासाठी लोहा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात अर्ज दिला होता. लिसनगाव जि. प. शाळेचे केंद्रप्रमुख दिगंबर शिंदे पंचायत समिती लोहा कार्यालयाच्या आस्थापना विभागात लिपिकाचेही काम करतात.
गटशिक्षणाधिकारी व्यवहारे यांची सर्व कार्यालयीन कामे ते पाहतात. तक्रारदारांनी अर्जित रजा मंजूर झाली की नाही हे पाहण्यासाठी लोहा पं. स. कार्यालयात जाऊन केंद्रप्रमुख शिंदे यांची भेट घेतली. शिंदे यांनी तक्रारदारांना अर्जित रजा मंजूर करण्यासाठी स्वतःसाठी व गटशिक्षणाधिकारी व्यवहारे यांच्यासाठी ४ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने १६ फेब्रुवारी रोजी लोहा पंचायत समिती कार्यालयात सापळा रचून तडजोडीनंतर केंद्रप्रमुख दिगंबर शिंदे यांना तक्रारदाराकडून ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी ला. प्र. वि. चे पोलिस निरीक्षक श्रीमती अनिता चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी दिगंबर शिंदे यांच्याविरुद्ध लोहा पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीमती अर्चना करपुडे करत आहेत.
शिस्त, प्रामाणिकपणाचे धडे शिकविणाऱ्या गुरुजींच्या कार्यालयात जर लाचखोरीच्या घटना घडत असतील तर नव्या पिढीने शिक्षण ते काय घ्यायचे असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे.


