अपडेटक्राईममहाराष्ट्रशैक्षणिक

बनावट शालार्थ आयडी प्रकरणी तीन शिक्षकांना अटक

Share this post

शालार्थ प्रणालीचा गैरवापर करून बनावट आयडीच्या माध्यमातून राज्य शासनाकडून नियमित वेतन घेतल्या प्रकरणी नागपूर सायबर पोलीसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. राज्य शासनानची तब्बल 25 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तीन बोगस शिक्षकांना अटक झाली आहे.

शालार्थ आयडी घोटाळ्यात आतापर्यंत 17 आरोपींना अटक झाली आहे. बनावट शालर्थ आयडीव्दारे वेतन घेणाऱ्या तीन सहाय्यक शिक्षकांना अटक झाल्यानं बोगस नियुक्ती मिळविणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.

सतीश विजय पवार (विद्याभूषण उच्च प्राथमिक शाळा मानेवाडा) हे सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहेत. प्रज्ञा विरेंद्र मुळे (विद्याभूषण उच्च प्राथमिक शाळा मानेवाडा) या सहाय्यक शिक्षिका या पदावर कार्यरत आहेत. तर भूमिका सोपान नखाते (आदर्श प्राथमिक शाळा बोरगाव) या सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे, अशी अटक झालेल्या अपात्र शिक्षकांची नावं आहेत.

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी रविंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटकेतील आरोपींनी शिक्षण उपसंचालक कार्यालयकडून अधिकृत आदेश प्राप्त नसताना बनावट ड्राफ्ट बनवून त्याद्वारे शालार्थ आयडी मिळवलं. त्या बनावट आयडीच्या आधारे त्यांनी आपली नियुक्ती दर्शवून नियमित वेतन घेतलं. सतिश पवार यांनी ऑगस्ट 2023 पासून तर प्रज्ञा मुळे आणि भूमिका नखाते यांनी जून 2024 पासून वेतन घेतलं आहे. यादरम्यानं या तिघांनी मिळून राज्य सरकारची सुमारे 25 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

सायबर पोलीसांनी केलेल्या तपासानुसार तिघांचाही गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचं उघड झालं आहे. शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात यापूर्वी 14 आरोपींना अटक केली आहे. यात विभागीय शिक्षण उपसंचालक 3, शिक्षणाधिकारी 3, लिपिक 4, शाळा मुख्याध्यापक 2 आणि शाळा संस्था संचालक 2 यांचा समावेश आहे. यात आता आणखी 3 शिक्षकांचा समावेश झाला आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *