माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रिपदावरून हटविले,दत्तात्रय भरणे नवीन कृषी मंत्री
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळ सभागृहातच ऑनलाईन रमी खेळतानाचे व्हीडिओ समोर आले होते. त्यानंतर कोकाटे आणि राज्य सरकारवर सर्व स्तरातून टीकेचा भडीमार सुरू झाला होता. तसंच, कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती.
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे विधिमंडळात मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळतानाचे व्हीडिओ सर्वप्रथम सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. त्यानंतर कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकार आणि अजित पवार यांच्यावर दबाव वाढत चालला होता.
माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि विधिमंडळात रमी खेळण्यामुळे शेतकरी आणि जनतेच्या मनात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे विरोधकांकडून आणि शेतकरी संघटनांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.याच मागणीसाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्ते उधळत आंदोलन केलं आणि “कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा” अशी मागणी केली.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांना मारहाण केली होती. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.या प्रकरणाचे पडसाद राज्यभर अनेक ठिकाणी उमटल्याचं पाहायला मिळाले होते.मारहाणीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर सुरज चव्हाण यांनी समाज माध्यमांद्वारे दिलगिरी व्यक्त करत माफीनामा जाहीर केला. तसंच, सुरज चव्हण यांची युवक प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टीही करण्यात आली होती.
इंदापूरचे आमदार आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे हे महाराष्ट्राचे नवे कृषिमंत्री असतील.दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण, तसंच अल्पसंख्यांक मंत्रालयाची जबाबदारी होती. यातील क्रीडामंत्रिपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली असून, ती जबाबदारी माणिकराव कोकाटेंकडे देण्यात आलीय.