वसतीगृहे,आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे दरडोई अनुदान वाढविले,विद्यार्थ्यांना मिळणार 2200 ते 2450 रुपये दरमहा अनुदान
विविध विभागांच्या वसतीगृहे, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
सामाजिक न्याय, दिव्यांग कल्याण, इतर मागास बहुजन कल्याण, आदिवासी विकास, महिला व बालविकास या विभागांमार्फत सुरु असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानीत संस्थांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे दरडोई परिपोषण अनुदान आता प्रती विद्यार्थी प्रती महिना 1500 रुपयांवरुन 2200 रुपये करण्यात येईल.
एड्सग्रस्त व मतीमंद निवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान 1650 रुपयांवरून 2450 इतके वाढविण्यात येईल.
यासाठी येणाऱ्या 346 कोटी 27 लाख इतक्या निधीला मान्यता देण्यात आली. या सर्व संस्थांमधून एकूण 4 लाख 94 हजार 707 विद्यार्थी असून सुमारे 5 हजार संस्था आहेत. वाढत्या महागाईमुळे हे अनुदान देखील वाढविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.