उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, अर्जासाठी ९ ऑगस्टपर्यंत मुदत
उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ९ ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहेत, असे विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. उमेश नागदेवे यांनी सांगितले. यासाठी पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी चे उमेदवार पात्र असणार आहेत. राज्यभरातून ४० जणांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.
परदेशी शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली शिक्षण संस्था वर्ल्ड रैंकिंग २०० च्या आत असली पाहिजे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या पालकांचे २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील उत्पन्न आठ लाखांच्या आतमध्ये असायला हवे.
९ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करून कागदपत्रे अपलोड केल्यानंतर १२ तारखेपर्यंत अर्जाची प्रत, मूळ प्रमाणपत्रे, कागदपत्रे, झेरॉक्स प्रतिसह त्या-त्या विभागीय कार्यालयात जमा करावी लागणार आहेत. याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान, विधी शाखेतर्गत विद्यार्थ्यांना विभागीय सहसंचालक कार्यालय उच्च शिक्षण येथे, तर व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वास्तुकलाशास्त्र अंतर्गत विद्यार्थ्यांना विभागीय सहसंचालक तंत्रशिक्षण येथे कागदपत्रे जमा करता येणार आहेत.
उमेदवारांचे वय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ३५ वर्ष आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी ४० वर्ष पेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी किंवा पालक किंवा दोन्ही नोकरीत असतील तर त्यांचे आयकर विवरणपत्र, फॉर्म नं. १६ व सक्षम प्राधिकारी यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गानी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. इतर विद्यार्थ्यांसाठी सक्षम प्राधिकारी यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किंमान ६०% गुणांसहित पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किंमान ६०% गुणांसहित पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. शासन शुध्दीपत्रक दि. ३०-१०-२०१८ नुसार परदेशातील विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी ही अर्हता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचा पीएच.डी. साठीचा अभ्यासक्रम हा बदलत्या काळातील विशेष संशोधन व वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम असल्यास असे उमेदवार या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकतात.
अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.