पीएचडी गाईड २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात…
पीएचडी (PHD)शोधप्रबंध सादर करून त्याला मान्यता देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न बाबुराव घोलप महाविद्यालयातील प्राध्यापिका व पीएचडी मार्गदर्शक अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी संबंधित महिला प्राध्यापिकेवर कारवाई केली. काही महिन्यांनंतर ती महाविद्यालयातून सेवानिवृत्त होणार होती.
पीएचडीच्या विद्यार्थ्यांकडून पैसे उकळण्याचा गोरख धंदा अनेक प्राध्यापकांकडून केला जातो.त्यात सर्वच प्राध्यापक सापडत नाहीत. मात्र, पीएचडी शोध प्रबंध सादर करण्यासाठी आणि त्याला मान्यता देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितल्याची घटना नुकतीच समोर आली.याप्रकरणी सांगवी येथील बाबुराव घोलप महाविद्यालयातील डॉ.शकुंतला निवृत्ती माने या महिला प्राध्यापिकेला २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. डॉ. शकुंतला माने ही बाबुराव घोलप महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाची प्राध्यापिका आहे. तिने पीएच.डी.चे मार्गदर्शन घेणाऱ्या विद्यार्थ्याकडून २५ हजार रुपयांची लाच मागितली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएचडीचा शोध प्रबंध विद्यापीठाकडे सादर करून त्याला मान्यता घेण्याची प्रक्रिया पीएचडी गाईडच्या माध्यमातून केली जाते. शकुंतला माने यांनी त्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत 40 वर्षीय प्राध्यापक यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. 25 हजार रुपयांपैकी 20 हजार रुपयांचा पहिला हप्ता घेतल्यानंतर संबंधित महिला प्राध्यापिकेला ताब्यात घेण्यात असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीचे सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४० वर्षीय व्यक्ती प्राध्यापक असून त्यांनी अर्थशास्त्र विषयामध्ये पीएचडी डीग्री प्राप्त करून घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे वीद्यापीठाकरीता ऑनलाइन प्रबंध तयार केलेला आहे. हा प्रबंध विद्यापीठाकडे सादर करण्यासाठी तक्रारदार प्राध्यापकांचे मार्गदर्शक (गाईड) म्हणून डाॅ. शकुंतला माने यांची विद्यापीठाकडून नियुक्ती झालेली आहे. तक्रारदार प्राध्यापकाने सादर केलेला प्रबंध रिजेक्ट करण्यासाठी व सुधारणा करून पुन्हा सादर करणे व त्यावर अप्रुव्हल देणे यासाठी डाॅ. शकुंतला माने हिने तक्रारदार प्राध्यापकाकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली.
सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठात देश विदेशातून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात. विद्यापीठाच्या इतिहासात आत्तापर्यंत अशा प्रकारची कारवाई झालेली नाही. मात्र, एका प्राध्यापकाडूनच गाईड म्हणून नेमणूक केलेल्या प्राध्यापिकेने लाच स्वीकारल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.