शिक्षक भरती प्रक्रियेत पात्र अभियोग्यताधारकांना पसंतीक्रम नोंदविण्यासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ…
राज्यातील शिक्षक भरतीस पात्र अभियोग्यताधारकांपैकी जवळपास एक लाख १८ हजार अभियोग्यताधारकांनी गेल्या दोन दिवसांत पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नोंदविला आहे. शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पात्र अभियोग्यताधारकांना पसंतीक्रम देण्यासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.
शिक्षक भरतीचे पोर्टल गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने बंद पडत असल्याची अभियोग्यताधारकांची तक्रार आहे. त्यावर, एकावेळीस जवळपास ७५ हजारांहून अधिक वापरकर्ते लॉगिन करत असल्याने पवित्र पोर्टल काही प्रमाणात संथ होत असल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील बहुप्रतीक्षेत असणारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेनुसार मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ आणि मुलाखतीसह चार हजार ८७९ पदांची शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत.
त्यासाठी पात्र अभियोग्यताधारकांना पसंतीक्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा पसंतीक्रम नोंदविण्यासाठी यापूर्वी गुरूवारपर्यंतची मुदत दिली होती. परंतु आता या मुदतीत १२ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे.


