अपडेटक्राईमछत्रपती संभाजी नगरतंत्रज्ञान

छत्रपती संभाजीनगर मध्ये टेलिग्रामवर ऑनलाइन जॉबचे आमिष दाखवत तरुणाला २१ लाख ७४ हजार रुपयांचा गंडा…

Share this post

टेलिग्रामवर ऑनलाइन जॉबचे आमिष दाखवत तरुणाला सायबर भामट्यांनी २१ लाख ७४ हजार रुपयांचा गंडा घातला. १९ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. सचिन नाथराव आंबट (३४, रा. गारखेडा) असे फिर्यादीचे नाव आहे.

सचिन हा मार्केटिंगचे काम करतो. त्याच्या टेलिग्राम खात्यावर प्रियांका नामक तरुणीने ऑनलाइन जॉब बाबत विचारणा केली. होकार देताच चांगल्या कमिशनचे आमिष दाखवत सुरवातीला त्याला दहा हजार गुंतविण्यास सांगितले. सचिनने पाठवलेल्या लिंकवर सर्व माहिती भरून पैसे गुंतवले. याचे त्याला सव्वासात हजार कमिशन भेटले. पुन्हा दहा हजार गुंतविल्यावर २२ हजार कमिशन भेटले.

प्रियांका हिने ऑनलाइन जॉबची माहिती देत दररोज एक हजार ते ५५०० रुपये कमिशनचे आमिष दाखवले. यानंतर सचिनला स्कायस्कॅनर नावाने लिंक पाठवत सर्व माहिती भरून मागवली. यानंतर ट्रेनिंगसाठी वॉलेटमध्ये दहा हजार रुपये बोनस देण्याचे आमिष दाखविले. सचिनला ‘कम लेट्स फ्लाय ४५६’ या टेलिग्राम ग्रुपवर अॅड केले होते. तिथे इतर मेंबर्सनी किती डिपॉझिट केले, कमिशन मिळाले याचे स्क्रीनशॉट टाकण्यात येत होते. यामुळे सचिनला अधिक विश्वास बसल्याने रक्कम गुंतवत गेला.

यानंतर त्याला विविध टास्क देत सातत्याने रक्कम गुंतविण्यास भाग पाडले. पण नंतर परतावा न मिळाल्याने रक्कम आणि कमिशन अशी २१ लाख ७४ हजारांची फसवणूक झाल्याच्या तक्रारीवरून फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक प्रविणा यादव तपास करत आहेत.

नागरिकांनी टेलिग्राम किंवा सोशल मीडियाच्या कोणत्याही आश्वासनाला बळी पडू नये. यातून मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार घडत आहे. आपली कोणतीही वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *