विद्यार्थ्यांनी पंचायत समितीवर बकऱ्या घेऊन केले आंदोलन…
बकऱ्या सांभाळायला द्या नाहीतर शाळेवर शिक्षक द्या अशी मागणी करत शहापूर येथील साकडबाव केंद्रातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी पंचायत समितीवर बकऱ्या घेऊन जात सोमवारी आंदोलन केले. शिक्षकांअभावी शैक्षणिक नुकसान होत असल्याने तसेच वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घालत आंदोलन केले.
शहापुर तालुक्यातील बहुसंख्य शाळांवर विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तालुक्यातील ५२ शाळा एक शिक्षकी असून शिक्षकांची तब्बल १६४ पदे रिक्त आहेत. शिक्षकांच्या या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून याबाबत शिक्षणविभागाकडे वारंवार अर्ज विनंत्या करूनही त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात होते.यामुळे त्रस्त झालेल्या जिल्हापरिषदेच्या साकडबाव केंद्रातील साकडबाव, कोळीवाडी आणि अल्याणी केंद्रातील उंबरवाडी येथील विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी बकऱ्यांसोबत शहापुर पंचायत समितीच्या शिक्षणविभागावर धडक दिली.
गटशिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घालत शिक्षक देता येत नसेल तर सांभाळायला बकऱ्या द्या अशी मागणी यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी केली. या मागणीची तात्काळ दखल घेत साकडबाव, कोळीवाडी आणि उंबरवाडी या तीन शाळांवर शिक्षकांची नेमणूक करण्यात आल्यानंतर विद्यार्थी व पालकांनी आंदोलन मागे घेतले.