९,५२६ महिला शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहिण योजनेचा लाभ,सामान्य प्रशासन विभागाचे कारवाईचे आदेश
राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’अंतर्गत तब्बल ९,५२६ महिला शासकीय कर्मचारी या योजनेचा लाभ नियमबाह्य पद्धतीने घेत असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर आता प्रशासन पातळीवर कारवाई करण्यात येणार आहे.
संबंधित महिलांनी मागील १० महिन्यांत सुमारे १४.५ कोटी रुपयांचा लाभ घेतला आहे. हे पैसे सरळ त्यांच्या बँक खात्यात जमा झाले असल्याने तो एक पुरावाच आहे.
सामान्य प्रशासन विभागाने या प्रकरणाची दखल घेत सर्व विभागांना कारवाईचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार संबंधित महिला कर्मचाऱ्यांकडून ही रक्कम वसूल केली जाईल आणि आवश्यक ती शिस्तभंगाची कारवाईही केली जाणार आहे. यात वेतनवाढ रोखणे, दंड आकारणे यासारख्या कारवाई करण्यात येणार आहेत.
महिला व बालकल्याण विभाग आणि माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या संयुक्त पडताळणीनंतर हे प्रकरण उजेडात आले आहे. गैरफायदा घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची यादी संबंधित विभागांना लवकरच पाठवली जाणार आहे. राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी यासंदर्भात घेतलेल्या बैठकीत,अशा घटनांमुळे भविष्यात इतर कर्मचाऱ्यांमध्येही नियम तोडण्याची प्रवृत्ती वाढू शकते, त्यामुळे नियमांचा जाणीवपूर्वक भंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी,असा आदेश बैठकीत देण्यात आला.